कृषी पर्यटन केंद्रातील रोपांचे महत्त्व आणि लागवड –भाग २

कृषी पर्यटन केंद्रातील रोपांचे महत्त्व आणि लागवड –भाग २

Importance and Planting of Plants in Agri-Tourism Center – Part 2

शेतीच्या बांधावर किंवा शेतीमध्ये जर एखादे काटेसावरीचे झाड असेल, तर शेतीमध्ये पिकावरील किडीवर काही प्रमाणत का होईना नियंत्रण येऊ शकते. शेतीमधील कीड आणि काटेसावरीचे झाड यांचा काय संबंध असेल बरे? काटेसावरीचे झाड हे एक खूप सुंदर फुलझाड आहे. या झाडाला जेव्हा फुलांचा बहर येतो, तेव्हा ते खूप आकर्षक दिसते. जवळपास वीसहून अधिक प्रकारचे पक्षी या झाडाकडे आकर्षित होतात. जेव्हा फुलांचा बहार नसतो, तेव्हाही हे झाड पक्ष्यांसाठी एक आकर्षणाचाच विषय असते. लवदार पाने, पसरट फांद्या हे पक्ष्यांना बसण्यासाठी व घरटी बांधण्यासाठी खूप उपयुक्त असतात. शेत-शिवारातील पक्ष्यांकडे अनेकदा उपद्रव म्हणून पहिले गेले आहे.

मात्र शेतीतील कीड नियंत्रणासाठी हे पक्षी कोणत्याही कीटकनाशकापेक्षा सरस ठरतील असेच आहेत. जेव्हा पक्ष्यांची पिल्ले अंड्यातून बाहेर येतात, तेव्हा त्यांना त्यांची आई दिवसातून जवळपास पन्नासहून अधिक अळ्या भरवते. हे प्रमाण वेगवेगळ्या पक्ष्यांमध्ये वेगवेगळे असते. मुद्दा असा आहे की, शेत-शिवारात पक्ष्यांना आकर्षित करणारी झाडे नसतील, तर शेतीमधील किडींचे प्रमाण अधिक असते. कृषी पर्यटनात रासायनिक शेती पाहण्यास कोणी उत्सुक नसते, त्यामुळे शिवारात, बांधावर, शेतीत पक्ष्यांना आकर्षित करतील अशी झाडे लावावीत. यामध्ये पळस, पांगारा, बहावा, काटेसावर, बोर, बाभळी, हिवर अशी अनेक झाडे सांगता येतील.

https://agrotourismvishwa.incategory/agro-tourism-vishwa-marathi/page/4/

मधाची पोळे आपल्या शिवारात किती आहेत, त्यावरही आपल्या शेतीमधील पिकाचे उत्पन्न किती वाढेल हे अवलंबून असते. ज्या शिवारात मधमाश्यांची पोळे अधिक असतात, त्या शिवारातील शेतीचे उत्पन्न इतरांच्या तुलनेत नक्कीच अधिक असते. पाऊसपाणी, माती, हवामान हे सर्व घटक सारखेच असतील, पण एका शिवारात मधाचे पोळे आहेत व एका शिवारात नाहीत. तर मधाचे पोळे असणाऱ्या शेतातील पिकांच्या उत्पन्नात २० टक्के ते ५० टक्के फरक पडू शकते. अर्थात हे प्रमाण प्रत्येक पिकानुसार वेगवेगळे असते. माधमाश्या हे परागीभवनाचे काम खूप चांगल्या पद्धतीने करतात. ज्या पिकामध्ये स्त्रीकेसर व पुंकेसर हे वेगवेगळ्या फुलामध्ये असते, त्या पिकांना मधमाश्या सारख्या बाह्य घटकांचे परागीभवनासाठी खूप मोठ्या प्रमणात गरज असते.

यांचे परागीभवन वार्यामार्फात सहजपणे होऊ शकत नाही. यासाठी मधमाशी व त्यासारखे छोटे कीटक, भुंगे यांची आवश्यकता असते. मधमाश्यांचे पोळे आपल्या शेत-शिवारात हवे असल्यास कडुलिंब, ऐन किंवा सादडा, अर्जुन, आंबा, बेहडा किंवा घोटफळ, पळस, पांगारा, रिठा ही झाडे आवर्जून लावली पाहिजेत. मात्र अलीकडे किटकनाशकाच्या वाढत्या वापरामुळे मधमाश्यांचे प्रमाण खूप घटले आहे. त्यामुळे झाडे लावण्याबरोबर, कीटकनाशक फावरणीवरही नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. नत्र किंवा नायट्रोजन या मुलद्र्व्याची कमतरता हे पिकांच्या वाढीतील एक महत्वपूर्ण अडथळा असतो. नायट्रोजनचे प्रमाण कमी असेल, तर पिक छोटे राहते, पिकातील फळ-फुल धारणा कमी होते. त्यातून उत्पन्न कमी होते. यासाठी पिकपद्धतीमध्ये बदल किंव मिश्र पिके घेण्याचा सल्ला दिला जातो. शेतीच्या बांधावर द्विदल प्रकारची झाडे असतील, तर शेतीला आवश्यक असणारा नायट्रोजन सहज मिळू शकतो. आपटा, शिरीष, किनई, शमी किंवा सौदड, हिवर, खैर अशी झाडे जर बांधावर असतील, तर या झाडांच्या मुळावरील गाठीमुळे जमिनीतील नायट्रोजनचे प्रमाण स्थिर राहण्यात मदत होते.

https://agrotourismvishwa.inagri-tourism-as-sustainable-tourism/

या शिवाय ज्या झाडांना मोठ्या प्रमाणात पालवी फुटते, भरभर वाढतात, मोठ्याप्रमाणात पानगळ होते असेही झाडे आपल्या शेतीच्या बांधावर असणे आवश्यक आहे. गुळभेंडी, बेहडा, ऐन, इत्यादी. ज्यातून हिरवळीचे खत बनवता येते. शेतीतील उत्त्पन्न वाढविण्यासोबतच शेती हा पर्यटनाचा विषय बनवायचा असेल, तर तामण, कदंब, काही आकर्षक बांबू प्रकार, अशी झाडे शेतीत आवर्जून लावावीत. पर्यटकांना झाडाखाली विसावण्यासाठी काही डौलदार वाढणारी झाडे लावावीत, तर काही झाडे अशीही असावीत, ज्यावर लहान मुलांना सहज चढता येईल. काही झाडे खाऊ देणारी पण असायला हवीत. या सगळ्या बाबींचा विचार करून शेतात व बांधावर झाडे सर्वप्रकारची लावली, तर शेती पर्यटनाला नक्कीच उपयुक्त ठरतील.

लेखक : बसवंत विठाबाई बाबाराव

प्रकल्प समन्वयक, पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणे 

https://agrotourismvishwa.inagro-tourism-policy-maharashtra/

 

Leave a Reply