लाख मोलाचे समाधान देणारे “पराशर कृषी पर्यटन केंद्र’’

लाख मोलाचे समाधान देणारे “पराशर कृषी पर्यटन केंद्र’’

“Parashar Agri-Tourism Center”

दोन हजार वर्षांपेक्षा अधिक काळाचा इतिहास असणाऱ्या तसेच बिटीशकालीन ‘सॅनिटोरिअम ऑफ इंडिया’ म्हणून परिचित असणाऱ्या निसर्गरम्य जुन्नर तालुक्यात पराशर कृषी पर्यटन केंद्र आहे. पुणे-नाशिक (एम.एच.-50) हायवेवरील आळेफाटा गावापासून चार कि. मी. अंतरावर राजुरी गावातील पराशर कृषी पर्यटन केंद्र म्हणजे महाराष्ट्रातील एक एकर या सर्वात कमी जागेवरील एकमेव असे कृषी पर्यटन आहे.

पराशर कृषी पर्यटन केंद्राचा परिसर.

पराशर नावाविषयी

पराशर ऋषींचे शेती क्षेत्रातील योगदान फार मोठे आहे. अकराव्या शतकात त्यांनी कृषी पराशर नावाचा शेती क्षेत्रावरील ग्रंथ लिहला. तसेच जुन्नर तालुका ही ऋषी पराशरांची कर्मभूमी व तपोभूमी आहे. त्यांना आदरांजली म्हणून तसेच त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि विशेष म्हणजे लोकांना त्यांच्या कार्याचे महत्त्व कळावे म्हणून या केंद्राला पराशर हे नाव केंद्राचे संचालक मनोज हाडवळे यांनी दिले आहे.

आपला व्यवसाय वेगळा आणि आपली आवड वेगळी हा कोणाचा समज असेल, तर या दोन्ही गोष्टी एकत्र कशा येऊ शकतात हे केंद्राचे संचालक मनोज हाडवळे यांच्याकडून शिकायला हवे. कृषीशास्त्रात पदव्युत्तर पदवी (एम.एस्सी.) शिक्षण घेतलेल्या तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत कृषी अधिकारी पदावर असणाऱ्या मनोज हाडवळे यांनी नोकरी सोडून उत्तर-पुणे जिल्ह्यात कृषी पर्यटनाचा नवा मार्ग निवडला आणि यशस्वीही करून दाखवला. मनोज हाडवळे यांनी 11 एप्रिल 2011 रोजी शिवछत्रपती जन्मभूमीतील राजुरी या गावात कृषी पर्यटन केंद्र सुरू केले.

सात वर्षांपूर्वी मुरबाड, खडकाळ व उंचसखल असणाऱ्या जागेवर आज नंदनवन फुलवले आहे. या केंद्राचे वैशिष्ट्ये म्हणजे या केंद्राची कुठेही जाहिरात किंवा मार्केटिंग करण्यात येत नाही, परंतु नैसर्गिकरित्या जोपासलेल्या या जैवविविधता असणाऱ्या पर्यटन केंद्राकडे देशातील नाही, तर विदेशातील पर्यटकही आकर्षित होत आहेत. आजर्पंत या पर्यटन केंद्रातील 21 देशातील नागरिकांसह जवळपास दहा हजार पर्यटकांनी पाहुणचार अनुभवला आहे.

पराशर कृषी पर्यटन केंद्राचे केंद्रचालक – मनोज हाडवळे.

कृषीपर्यटन केंद्राविषयी

एक एकर एवढ्या कमी तसेच उंच सखल जमिनीचा पुरेपुर वापर करत निसर्गसंपन्न असे पर्यटन केंद्र बनवले आहे. लाकडी पुल, फुलझाडे, वृक्ष, फळ झाडे टाकाऊ वस्तूंचा तसेच पारंपारिक जुन्या वस्तूंचा चपखलपणे वापर करून पर्यटन केंद्र आकर्षक बनवण्यावर भर दिला आहे. केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ आल्यावरच हिरवळीची अनुभूती व्हायला सुरूवात होते. केंद्राचे प्रवेशद्वार हे वेलींनी अच्छादलेले असून त्याच्या सुशोभीकरणासाठी शेतीकामासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा वापर केला आहे. प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर सर्वप्रथम’ दृष्टीस पडतो तो लाकडी पूल. या पुलावरून पर्यटन केंद्रावर नजर टाकल्यास विविधतेने नटलेले वृक्ष, वेली,फुले आणि पक्षी, फुलपाखरे नजरेत भरतात. विविध पक्ष्यांचा किलबिलाट व चिमण्यांचा चिवचिवाट नवीन जगात आल्याची अनुभूती करून देतो. 250-300 चिमण्यांसह 21 प्रजातीचे पक्षी या पर्यटन केंद्रात वास्तव्यास आहेत. या पर्यटन केंद्रात काही झाडे लावलेली आहेत. तर बहुतांश झाडे ही नैसर्गिकरित्या उगवलेली आहेत. याच ठिकाणी भाजीपाला हा कोणतेही खत न वापरता पिकवता येतो. या भाजीपाल्यापासून पर्यटकांना जेवण बनवण्यात येते. केंद्रात पर्यटकांना विसावण्यासाठी लाकडी खुर्च्या, बाक, टेबल बनवलेले आहेत. त्यावर सावली आणि गवतीछप्पर उभारले आहेत, तर काही झाडांभोवती विशिष्ट रितीने पार बांधून पर्यटकांना विसावण्यासाठी आसनव्यवस्था बनविलेली आहे.

 

केंद्रातील इतर ठिकाणे

1) पेंटिंग रूम – नैसर्गिक रंग असलेल्या घेरूने रंगावलेल्या भींतीवर वारली चित्र रेखाटलेली आहेत. तसेच या रूमचे वैशिष्ट्ये म्हणजे पर्यटकांना स्वतःही चित्रकलेचा अनुभव घेता येतो. याच रूममध्ये भारतीय कृषी संस्कृतीचा 3200 वर्षांचा इतिहास तक्त्यांच्या स्वरूपात मांडलेला आहे.

2) किचन गार्डनिंग – किचन मधील टाकाऊ वस्तुंपासून बनवलेल्या कुंड्यांमध्ये रोप लागवड केली आहे. या रूममध्ये गांडूळखत प्रकल्प देखील आहे.

3) पराशर कुटी – या कुटीमध्ये पराशर ऋषींची दोन ते अडीच फुटांची मुर्ती आहे. तसेच या कुटीमध्ये मेडिटेशन पॉईंट आहे. या कुटीचा वापर पर्यटक ध्यानधारणा करण्यासाठी करतात.

4) मुख्य हॉल – आसन व भोजनव्यवस्थेसाठी वापरल्या जाणाऱ्या हॉलमध्ये शेती अवजारे,कणगी, मडक्यांची उतरंड, जुन्या पारंपारिक वस्तु ठेवलेल्या आहेत. तसेच हा हॉल विविध चित्रांनी सजविलेला आहे. आसनव्यवस्थेसाठी छोटे टेबल मांडलेले आहेत. शेणाने सारवलेल्या या हॉलमध्ये स्वच्छता व टापटीप वाखाणण्यासारखी आहे.

5) पर्ण कुटी – पर्यटकांना विश्रांती करण्यासाठी हॉलच्या दोन्ही बाजूंनी पर्णकुटी बांधलेल्या आहेत. ऊसाच्या पाचरापासून साकारलेले ते छत, तुराटी-बांबू व ऊसाच्या पाचटापासून भिंती बनविलेल्या आहेत. या कुटींचे विशेष महत्त्व म्हणजे त्या उन्हाळ्यात थंड व हिवाळ्यात उबदार राहतात. पर्णकुटीतील सर्व वस्तू लाकडी व जमीन शेणाने सारवलेली आहे. लाकडी खिडक्या स्लाडिंगच्या असून त्यांना सफेद मांजरपाट कापडापासून बनवलेले पडदे आहेत. पर्यटकांना पांघरण्यासाठी देण्यात येणाऱ्या गोधड्या बचतगटाकडून शिवून घेतलेल्या आहेत. पर्यटकांसाठी महाराष्ट्र अनलिमिटेड सारखी मासिके वाचनासाठी ठेवलेली आहेत. कुटीमध्ये लाकडी आरसे बसवलेले आहेत. स्वयंपाक घरातील तेलाच्या रिकाम्या डब्यापासून डस्टबिन बनविलेले आहेत. मातीपासून बनविलेल्या वस्तू तसेच हस्तचित्रे कुटीमध्ये ठेवलेली आहेत. या पर्णकुटीमध्ये नैसर्गिकरित्या उजेड येतो. केंद्रात एकूण दहा कुटी आहेत. प्रत्येक कुटीला वैशिष्ट्यपूर्ण नाव दिलेले आहे. उदा. शारंगधर, कश्यप, सुरपाल, मेधातिथी, कौटिल्य, गर्ग, मांडव्य, चावुंडराय,वसहमहीर अशी नावे दिलेली आहेत. जेणेकरून पर्यटकांना भारती कृषीक्षेत्रास योगदान देणाऱ्या ऋषींचा परिचय होईल.

6) मचाण – केंद्राच्या नैऋत्य दिशेस मोठे मचाण बनवलेले आहे. या मचाणावरून निसर्गसंपन्न जुन्नर तालुक्याच्या परिसरावर दृष्टीक्षेप टाकता येतो. मचाणाची उंची जणूकाही कृषी पर्यटन केंद्राने गाठलेली उंची दर्शवते.

https://agrotourismvishwa.inconservation-promotion-of-rural-culture-through-agricultural-tourism-part-2/

भोजनव्यवस्था

पर्यटकांना केंद्रातील भाज्यांपासून जेवण बनवले जाते. भाज्या बनवताना स्थानिक मसाल्यांचा वापर केला जातो. पर्यटकांसाठी काळ्या-पिवळ्या मसाल्यपासून बनवलेल्या दोन भाज्या, वरण भात, गोड पदार्थ, चपाती, भाकरी, पापड-कांदा, लोणचं असा चुलीवरच्या मेजवाणीचा बेत असतो. पर्यटकांना सकाळी आरोग्यर्धक हर्बल ही बनवून दिला जातो.

उपक्रम

कृषी पर्यटनाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न मनोज हाडवळे यांनी केला आहे. केंद्राच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.

1) शेत शिवारात फेरफटका – पर्यटकांना शेत-शिवाराची सफर घडवली जाते. शेतीच्या माहिती बरोबरच प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव दिला जातो.

2) बैलगाडी व ट्रॅक्टरची सफर – सायंकाळच्या वेळी पर्यटकांना बैलगाडी व ट्रॅक्टरमधून आजुबाजूच्या परिसराचे दर्शन घडविले जाते.

3) पेंटिंग– मातीच्या वस्तू बनविणे. पर्यटकांना चित्रकलेचा अनुभव देण्यासाठी चित्र काढण्यासाठी त्याठिकाणी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. तसेच केंद्रातील मातीपासून वस्तू बनवायला शिकवले जाते.

4) योगमेडिटेशन, ध्यानधारणा – सकाळच्या रम्य वातावरणात योग, मेडिटेशन, ध्यानधारणा शिकवली जाते. तसेच जवळच असणाऱ्या डोंगरावर मॉर्निंग वॉकसाठी नेले जाते.

5) रेडी-टू-कुक  पर्यटक जेव्हा संख्येने कमी प्रमाणात असतात, तेव्हा त्यांना जेवण बनवण्याचा अनुभव दिला जातो. विशेषतः विदेशी पर्यटकांसाठी हा उपक्रम राबवला जातो.

6) लायब्ररी– केंद्रातील लायब्ररीत जवळपास 1,500 पुस्तके आहेत.

7) डॉक्युमेंट्री – जुन्नर बिबट्या प्रवण क्षेत्रात येत असल्याने पर्यटकांना बिबट्याविषयी माहिती व्हावी, यासाठी बिबट्यावर डॉक्युमेंटरी दाखवली जाते.

वैशिष्ट्ये

1) या कृषी पर्यटनात धुम्रपान, मांसाहार, मद्यपानावर प्रतिबंध आहेत. त्यामुळे साहजिकच परिसराची पवित्रता राखली जाते.

2) टी.व्ही नसल्यामुळे आपोआपच पर्यटक एकमेंकांच्या सोबत वेळ घालवायला प्राधान्य देतात व त्यांचा पर्यटन केंद्राला भेट देण्याचा हेतू सार्थक होतो.

कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास आणि ग्रामीण विकासातून महाराष्ट्राचा विकास हेच ब्रीदवाक्य जपणारे ‘पराशर कृषी पर्यटन केंद्र’ पर्यटकांना लाख मोलाचे समाधन देवून जाते.

लेखिका – सुप्रिया थोरात. 

https://agrotourismvishwa.inbirds-home-at-parashar-agri-tourism-center/

 

 

Leave a Reply