कृषी पर्यटन – एक विस्तारणारा परिघ

कृषी पर्यटन – एक विस्तारणारा परिघ

Agri-tourism – an expanding perimeter

‘कृषी पर्यटन’ ही संकल्पना तशी अजूनही नवीन असल्याने यावर आधारित म्हणावी तेवढी पुस्तकं बाजारात उपलब्ध नाहीत. त्यामुळे कृषी पर्यटन केंद्र चालवणारे आणि कृषी पर्यटनाचा उत्तम अभ्यास असणारे मनोज हाडवळे यांनी स्वतः “कृषी पर्यटन – एक शेतीपूरक व्यवसाय”नावाने पुस्तक प्रकाशित केलं आहे. कृषी पर्यटन हे व्यवसायिक दृष्ट्या बाळसं धरत असलेलं क्षेत्र असलं, तरी बऱ्याच लोकांना ही संकल्पना पुर्णपणे समजलेली नाही. कारण काही वर्षांपूर्वी जेव्हा कृषी पर्यटन लोकांना माहिती झाले, तेव्हा खूप लोकांनी जमेल त्या पद्धतीने आणि आपल्या कल्पनेने कृषी पर्यटन केंद्रं उभारली. तेव्हा अभ्यासकांना पडलेला हा खरा प्रश्न होता की, या स्थळांना कृषी पर्यटन स्थळ म्हणायची का? कारण कोणी मंगल कार्यालय बांधून त्याला कृषी पर्यटन केंद्राचं नाव दिलं, तर कुणी आलिशान हॉटेल बांधून त्याला कृषी पर्यटन केंद्र म्हणून घोषित केलं. तर या गोष्टी म्हणजे कृषी पर्यटन होतं नाही. त्यासाठी आधी संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. कृषी पर्यटनाची संकल्पना सांगताना मनोज हाडवळे आपल्याला ग्रामीण संस्कृती समजावून सांगतात. पूर्वीच्याकाळी सुट्टीसाठी ग्रामीण भागात आलेल्या शहरी लोकांचा पाहुणचार आणि त्या दरम्यान त्या लोकांनी अनुभवलेले शेतीतील दिवस त्यांना जगण्यातील पुरेपूर आनंद द्यायचे. पण कालांतराने हे कमी झालं. अर्थार्जनासाठी शहराकडे आलेली माणसं शरातलीच होऊन बसली. त्यामुळे त्यांना हक्कच असं गावी कोणी उरलंच नाही. अशा शहरी लोकांनी जायचं कुठं? तर ही माणसं एखाद्या शेकर्यांच्या इथं राहून त्यांना ठराविक पैसे देऊ लागले आणि कालांतराने यालाच कृषी पर्यटन असे नाव मिळाले.

या पुस्तकाचा उपयोग कृषी पर्यटन केंद्र उभारू इच्छीणाऱ्याला तर होईलच, शिवाय शेतकऱ्यांना, विद्यार्थी अभ्यासकांना देखील होईल. कारण यामध्ये पर्यटनाची संकल्पना, पर्यटनाचे प्रकार, सद्यस्थिती, भविष्यातील संधी, पर्यटकांची दिनचर्या कशी असावी, कोण कोण हा कृषी पर्यटनाचा व्यवसाय करू शकतं, कोणत्या शेतीच पर्यटन क्षेत्र कसं होईल, भौगोलिक स्थानानुसार कोणत्या कोणत्या घटकांचा कृषी पर्यटन केंद्रात समावेश करायचा इ. व अशा बऱ्याच महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा केली आहे. तसेच उदाहरणादाखल बँकेला कर्जमागणीसाठी सादर करावयाचा खर्च व उत्पन्नाचा तपशील दाखवताना गुंतवणूक अंदाजपत्राचा तक्ता दिला आहे. कृषी पर्यटन केंद्र उभारणी बरोबरच आपल्या कृषी पर्यटन केंद्राची जाहिरात व मार्केटिंग कशी करावी? आपल्या पर्यटन केंद्राचे संकेतस्थळ कसे असावे याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. साधारण १६ प्रकारणांमधून लेखकाने कृषी पर्यटनाविषयी पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तर जे कोणी कृषी बांधव ‘कृषी पर्यटन’ करू इच्छीतात किंवा याविषयी सविस्तर जाणून घेऊ इच्छीतात, त्यांनी जरूर वाचावे असे हे पुस्तक आहे.

पुस्तक परिचय : ज्योती बागल 
पुस्तकाचे नाव कृषी पर्यटन : एक शेतीपूरक व्यवसाय
लेखक मनोज हाडवळे
प्रकाशक सकाळ मीडिया प्रा. लि

https://agrotourismvishwa.inparashar-agri-toruism/

Leave a Reply