कृषी पर्यटनातील आव्हाने आणि संधी

कृषी पर्यटनातील आव्हाने आणि संधी  Challenges and Opportunities in Agri-Tourism

        कृषी पर्यटन म्हणजे शेतात आणि गावात फेरफटका मारणे, आपल्या संस्कृतीची ओळख करून घेणे,  नैसर्गिक  आनंद घेणे.  शहरी जीवनशैलीचा कंटाळा आलेल्या लोकांनी दोन दिवस शेतकर्‍यांच्या शेतावर जाऊन राहणे व शेतकर्‍यांनी शहरी लोकांचा सशुल्क पाहुणचार, आदरातिथ्य करणे म्हणजे कृषी पर्यटन होय. कृषी पर्यटन हा पर्यटनाचा नवीन पदर आहे. ‘कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास आणि ग्रामीण विकासातून महाराष्ट्राचा विकास’ या ब्रीद वाक्याला साजेसे कृषी पर्यटन क्षेत्र आहे. शेती व्यवसाला जोड व्यवसायाची साथ देऊन उत्पादनांत भर घालता येणारा प्रकल्प म्हणजे ‘कृषी पर्यटन’ होय.

कृषी पर्यटन म्हणजे प्रत्यक्षात शेती कशी केली जाते.  शेती कशी पीकवतात.  शेतात कोण कोणती पीके कधी येतात.  शेतीची लागवड कधी आणि कशी केली जाते.  एकंदरीत ग्रामीण भागातील शेती विषयक सर्व उपक्रम आणि कार्य जे शेतात चालतात आणि ते बहुतांश शहरी लोकांना वाचून किंवा ऐकूण माहिती असते.  पण प्रत्यक्षात शेतात जाऊन ते पाहणे,  अनुभवणे,  स्वत: शेतात काम करणे आणि खऱ्या अर्थाने अनुभव घेऊन,  ग्रामीण जीवन जगण्याचा पर्याय कृषी पर्यटनाच्या माध्यामातून ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष स्व: अनुभव घेणे म्हणजे “कृषी पर्यटन होय”.

कृषी पर्यटन केंद्राचा परिसर

ग्रामीण भागातील शांत वातावरण, शुध्द हवा, निसर्गरम्य परिसर, कला, संकृती, वेशभूषा, खाद्यसंकृती तसेच गावात आढऴणाऱ्या दुर्मिळ वनस्पती, झाडे, प्राणी, पक्षी, झरे, डोंगर, दऱ्या, निसर्ग निरीक्षण, शिवार शेतीचा अनुभव घेणे. शहरी लोकांनी दोन दिवस शेतकर्‍यांच्या शेतावर जाऊन राहणे व शेतकर्‍यांने शहरी लोकांचे सशुल्क स्वागत करणे किंवा आदरातिथ्य पाहुणाचार करणे म्हणजे “कृषी पर्यटन”.

कृषी व ग्रामीण पर्यटन म्हणजे काय ? What is Tha agri Tourism ?

या नव्या आणि महत्वाच्या क्षेत्रात अनेक संधी आणि आव्हाने आहेत. स्वतंत्र कृषी पर्यटन धोरण, हक्काच व्यासपीठ, असंघटित केंद्र, प्रशिक्षणाची गरज,  भांडवल,  मार्केटिंग आणि जाहिराती,  संकल्पनेचा प्रचार आणि प्रसार, कायदेशीर परवानग्या,  शास्रशुध्द माहितीचा अभाव,  कृषी पर्यटन केंद्रासाठी आचारसंहिता,  संशोधनाची गरज,  मुलभूत सुविधा,  वाहतूक व्यवस्था,  नैसर्गिक आपत्ती,  पर्यटकांची असुरक्षितता,  स्थानिक समस्या, कृषी पर्यटन केंद्र का रिसोर्ट?,  लक्ष गट,  मद्यपान,  अचानक आलेले पर्यटक यांसारखी अनेक आव्हाने आहेत मात्र संधी पण कमी नाहीत. शेतीला उत्तम जोड व्यवसाय,  गावाचा आणि शेतीचा विकास, गावच्या आर्थिक स्तरात वाढ,  रोजगार संधी,  शेती मालाला बाजारपेठ,  शेतकऱ्यांना पैसा आणि प्रतिष्ठा,  ग्रामीण महिलांचे सबलीकरण,  स्थानिक कलाकारांना व्यासपीठ,  ग्रामीण व शहरी संस्कृतीचा संगम,  माहिताचे संक्रमण, उज्ज्वल भविष्य, ग्रामीण लोककला / संस्कृतीचे संरक्षण,  शाश्वत शेती आणि पर्यटन,  विविधधेत एकता, औषध वनस्पतीचे संवर्धन,  शैक्षणिक सहलीचे ठिकाण, सेंद्रिय शेतीचा प्रसार अशी अनेक आव्हाने कृषी पर्यटन क्षेत्रात आहेत. त्यापैकी महत्वाच्या आव्हान आणि संधी विषयी चर्चा करूया…

https://agrotourismvishwa.inwho-and-how-start-agri-rural-and-farm-tourism/

कृषी पर्यटनात आव्हाने आणि संधी  Agri Tourism is Best Opportunities for Farmer and Agri Students

 

कृषी पर्यटन केंद्रातील दृश्य

कृषी पर्यटन धोरणाचे अमलबजावणी : (Implementation of new  Agri-Tourism Policy)

कृषी पर्यटनासाठी शासनाकडून कोणतेही स्वतंत्र धोरण नाही. असे धोरण नसल्यामुळे कृषी पर्यटन केंद्र उभारण्याऱ्या शेतकऱ्यांना अनेक प्रश्न पडत आहे. उदा. केंद्र उभारण्यासाठी किती एकर जागा हवी,  कृषी पर्यटन केंद्रांसाठी शासकीय योजना कोणत्या आहेत,  बँकेतील कर्ज, नियम व अटी, कृषी पर्यटनाची शासकीय व्याख्य़ा,  संकल्पना,  कृषी पर्यटनाची रूपरेषा आणि इतर काही बाबींची माहिती नसल्यामुळे जो तो आपापल्या पध्दतीनुसार कृषी पर्यटन केंद्र सुरू करत आहे. मग, मी जे कृषी पर्यटन केंद्र उभे केले आहे तेच योग्य, अथवा ठरावीक एकरातच कृषी पर्यटन केंद्र असावे. असे एक ना अनेक प्रश्न पडतात असे शेतकरी आणि कृषी पर्यटन केंद्र चालवणारे सांगतात. म्हणून महाराष्ट्राचे स्वतंत्र असे कृषी पर्यटन धोरण असावे असे वाटते.

हक्काच व्यासपीठ : (Right Platform for Agro tourism) 

 महाराष्ट्रात अंदाजे 500 कृषी पर्यटन केंद्र आहेत. या सर्वांसाठी एक हक्काच आणि आपलं म्हणून व्यासपीठ नाही.  शासनाची कोणताही पूर्ण वेळ संस्था काम करत नाही.  समविचारी अथवा कृषी पर्यटनासाठी झटणाऱ्या लोकांना एकत्र घेऊन शासनाने कृषी पर्यटन केंद्रासाठी हक्काच व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे आणि कृषी पर्यटन संकल्पनेचा विस्तार,  प्रचार आणि प्रसार केला पाहिजे.  प्रगतीशील महाराष्ट्राने अनेक नवनविन संकल्पना, विचार या देशाला दिले आहे. यापैकी एक म्हणजे कृषी पर्यटन संकल्पना एक आहे.  एका व्यासपीठामुळे अनेक प्रश्न सुटू शकतात.  मार्गी लागू शकतात.  सध्या महाराष्ट्रात कृषी केंद्राना एकत्र करण्याचा काम मार्ट आणि ATDC  करत आहेत.  यांच्यामार्फत काही पर्यटन केंद्रांची नावे नोंदली गेली आहेत.  संस्था एकापेक्षा जास्त असल्यामुळे नेमकं कोणाकडे नोंद करावी, कोणते पालकत्व घ्यावे असे प्रश्न पडतात. या स्पर्धेतून आम्ही कसे चांगले आहोत,  अथवा आम्हीच कृषी पर्यटनाचे वाहक आहोत,  आम्हीच तारणहार आहोत यांसारखे अनेक प्रश्न निर्माण होतात आणि कृषी पर्यटनाच्या मूळ संकल्पनेला फाटा दिला जातो आणि श्रेय घेण्याच्या वादातून शेतकरी गोंधळला जातो.  म्हणून या सर्व गोंधळातून एक ध्येय आणि उद्धिष्ट्ये पूर्ण करणार हक्काच व्यासपीठ तयार करणे हे एक मोठे आव्हान आहे.

 

https://agrotourismvishwa.injal-vishwa-agri-and-river-camp-tourism-in-tapola/

 कृषी पर्यटन केंद्राचे मार्केटिंग आणि जाहिरात : (Marketing and advertising for agri and ruural tourism)

मार्केटिंग आणि जाहिरात करताना कृषी पर्यटन केंद्राना खूप मोठ्या अडचणी येतात.  लाखो रूपये खर्च करून केंद्र उभारतो पण योग्य मार्केटिंग आणि जाहिराती न केल्यामुळे आपली सेवा,  शेतातील उत्पादने, कृषी पर्यटन केंद्राचे वेगळेपण तो लोकांपर्यंत पोहचत नाही. योग्य ग्राहकापर्यंत न गेल्यामुळे अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते.  आजच्या काळात डिजिटल आणि सोशल मीडियामुळे शेकतऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे आहे.  शेती करायची का ? पर्यटकांची ज्ञानसेवा द्यायची का ? आपल्या केंद्राचे मार्केटिंग आणि जाहीराती करायचा अशा संभ्रमात शेतकरी असतो. कृषी पर्यटन केंद्राचं मोठ साम्राज्य उभे केल्यानंतर जर पर्यटकच येत नसेल किंवा लोकांना त्यांच्या केंद्राविषयी जागृती, प्रसार आणि प्रचार होत नसल्यामुळे शेतकरी मार्केटिंगसाठी कमी पडत आहेत. ही आव्हाने कमी करण्यासाठी Agro tourism vishwa प्रयत्न करत आहे.

कृषी पर्यटन केंद्रांमध्ये उत्पन्नाची संधी खूप चांगली आहे पण त्याचं मार्केटिंग करण्यासाठी शेतकऱ्यांना नितांत प्रशिक्षणाची गरज आहे. वृत्तपत्र, टेलिव्हिजन, रेडिओ, समाजमाध्यमातून कधी आणि कसा, किती वेळ आणि महत्वाचे म्हणजे कोणासाठी जाहिराती करावी.  याविषयी शेतकरी अज्ञान आहेत. हे अज्ञान दूर करणे मोठे आव्हान आहे.

 

 

आर्थिक मदत : (Financial Support for Rural and Agro Tourism )

अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भांडवल. सध्यातरी शासनाकडून कोणतीही थेट मदत कृषी पर्यटनाला मिळत नाही.  महारष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून कृषी पर्यटन केंद्रांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळत नाही.  नाबार्ड आणि शासनाकडून शेतीपूरक यॊजना आहेत.  रोपवाटिका, विहीर खोदणे,  मोटारीसाठी पैसे, पाईपलाईन फळरोप यासह विविध योजना आहेत.  शेतीसाठी अनुदान मिळते.  यातून शेतीचा विकास होऊ शकतो. पण हवा तेवढे कृषी पर्यटन केंद्रांचा सर्वांगीण विकास होत नाही. पण ज्या काही पूरक योजना आहेत. त्यांचेही ‘सरकारी काम सहा महिने थांब’ या उक्तीप्रमाणे शासनाचे काम चालते.

कृषी पर्यटन केंद्र सुरू करत असताना किती खर्च करावा लागेल आणि कशा पद्धतीने ते उभं करायचा यासाठी भांडवलाचा सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहत आहे.  सरकारने याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.  इच्छुक कृषी पर्यटन केंद्र संचालकांची त्यांनी मुलाखत घेऊन त्यांची क्षमता तपासून शासनाकडून अर्थसहाय्य देण्यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजे.  शासनाने चांगल्या पद्धतीने एक सुवर्णमध्य काढला पाहिजे. भांडवल प्रकल्पाचा कणा  आहे. शेतकरी केवळ भांडवल नसल्यामुळे कृषी पर्यटन केंद्र चालू करत नाहीत. पैशांअभावी काही तरुण केंद्र उभे करू शकत नाही.  कृषी पर्यटनामूळे महाराष्ट्रातील होतकरू बेरोजगार तरुणांना एक उत्तम रोजगाराची संधी मिळू शकते.

 कायदेशीर परवानग्या  (Legal Permissions and Agriculture Tourism)

आणखी एक आव्हान म्हणजे कायदेशीर परवानगी.  ‘भीक नको पण कुत्रा आवर’ अशी परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते.  शेतकऱ्यांसाठी सरकार फार मोठमोठ्या योजना निर्माण करत असते. पण योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या काही अटी आहेत त्या जाचक असतात.  या अटी पूर्ण करत असताना शेतकऱ्यांची दमछाक होते.  त्यामुळे अनेक तरूण शेतकरी त्यांच्या उद्योगाचे स्वप्न अर्धवट सोडताना दिसून येत आहेत.  या नियम व अटींना याला कृषी पर्यटन अपवाद नही.  त्यासाठी शासनाने विशेष काळजी घेतली पाहिजे चांगल्या पद्धतीचे सुविधा ग्रामीण भागामध्ये सुरू केले पाहिजे. सर्व परवानग्या एक खिडकी योजने अंतर्गत असल्या पाहिजे.  या छोट्या पण महत्वाच्या परवानग्यांमुळे कृषी पर्यटनासारख्या सुंदर व्यवसाय सुरू करण्यापासून अनेक शेतकरी वंचित राहिले असल्याचे आपण पाहतो.

नैसर्गिक अपघात (Natural Disasters and Farm Tourism)

नैसर्गिक आपत्ती हा अतिशय महत्त्वाचा आणि आव्हानात्मक मुद्दा आहे.  भूकंप, दुष्काळ, पूर, आणि इतर आपत्ती कधी का होईल हे कोणी सांगू शकत नाही.  पर्यटन केंद्रवार अनेक छोटे मोठे अपघात होतात.  अगदी कुत्रा चावण्यापासून ते नैसर्गीक संकटापर्यंत. कोणताही अपघात ठरवून होत नाही. पर्यटकांच्या चुकीच्या वागण्यामुळे मधमाशी, साप काही पाळीव प्राण्यांची धोका निर्माण होऊ शकतो.  विहिरीत किंवा तलाव यामध्ये पोहण्याचा मोह पर्यटकांना होऊ शकतो. अशावेळी पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाय केले पाहिजे.  पर्यटकांना मौजमजा करताना त्यांना काही दुखापत होणार नाही याची पुरेशी काळजी केंद्र प्रमुखांनी घेतली पाहिजे.  शेतकऱ्यांनी कलात्मक उत्तम पद्धतीने कृषी पर्यटन केंद्र उभारलेले असतात.  अशा परिस्थितीत सोसाट्याच्या वाऱ्यासह,  मुसळधार पाऊस असेल, नैसर्गिक वीजा असतील किंवा पूर असेल भूकंप असेल यांसारख्या अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते.

कृषी पर्यटन चालवताना स्थानिक समस्या (Agro Tourism and Local Problem)

गावातला एखादा तरुण काहीतरी वेगळं करून स्वतःची उपजीविका करत असेल किंवा एखादा नविन व्यवसाय करत असेल तर, आपणही त्याच्या सारखे काहीतरी करावं या कल्पनेला फाटा देत त्यांनी जे काय चालू केले ते कशा पद्धतीने बंद पडेल यासाठी प्रयत्न करणारे हितचिंतक परिसारत असतात.  कृषी पर्यटन केंद्र बदनाम कऱण्याचा प्रयत्न केले जाते.  येणाऱ्या पर्यटकांना चुकीची माहिती अथवा गैरसमज भीती निर्माण होईल असे काही केले जाते.  अशी उदाहरणे आहेत. तर कृषी पर्यटन केंद्राना जाण्यासाठी रस्ते खराब आहेत.  चोवीस तास वीज नसते. स्थानिक दबाव, परिसरातील काही लोक जाणून बुजून पर्यटकांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात.  उदा. पर्यटकांच्या राहत्या ठिकाणी दगड मारणे. परिसरातील मधमाशांचा उपद्रव्य कऱणे. यांसारख्या अनेक छोट्या-मोठ्या समस्या असतात.  केंद्र चालकाला यावर विचार करून तोडगा काढणे गरजेचे असते.  शहरातील पर्यटक जेव्हा ग्रामीण भागात येतात. पर्यटक कळत नकळत कुठे गावात फिरताना अशा वेळी स्थानिक लोकं त्यांना काही बोलतात असे केंद्र प्रमुख सांगतात.

 

https://agrotourismvishwa.ingovernment-of-maharashtra-approves-agri-tourism-policy2020/

कृषी पर्यटन केंद्रात पर्यटकांची असुरक्षितता (Insecurity of tourists in Agro Tourism)

कृषी पर्यटन केंद्रावरील आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे.  ती म्हणजे बऱ्याच ठिकाणी येणारे पर्यटक हे शहरी भागातील असतात.  ग्रामीण जीवनाचा आस्वाद घेण्यासाठी ते आलेले असतात.  त्यामुळे ग्रामीण भागातील काही धोकादायक गोष्टी यांच्याबद्दल त्यांना कल्पना नसते.  एकाद्या कृषी पर्यटन केंद्रामध्ये घटना घडली असेल तर त्या विषयी अपप्रचार केला जातो. शहरी भागातून आलेले पर्यटकांची अतिशय काटेकोरपणे काळजी घेणे गरजेचे असते. कृषी पर्यटन केंद्राजवळ एखादी विहीर असेल तर चुकून अपघात घडू नये म्हणून काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. दुसरी गोष्ट आपण कृषी पर्यटन केंद्रामध्ये पर्यटक मुक्कामी असतो त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संभाव्य धोके आहेत ते टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.  

कृषी पर्यटन क्षेत्रात प्रशिक्षणाचा अभाव  (Challenge Lack of Training for Farmers)

 कुठली गोष्ट करायची असेल तर त्याच्याबद्दल पूर्व ज्ञान असणं गरजेचं असतं. त्यामुळे त्या ठिकाणी माणसाला जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक गोष्टी करत असताना त्याचे योग्य ते प्रशिक्षण असणे गरजेच असतं तरच ही गोष्ट यशस्वी होऊ शकते आणि कृषी पर्यटन केंद्र त्याच्यामध्ये खूप सगळ्या गोष्टी अशी आहे की ते प्रशिक्षणाशिवाय करणे शक्य नाही किंवा योग्य प्रशिक्षणाशिवाय जर आपण या व्यवसायामध्ये उतरलो तर कदाचित आपल्या व्यवस्थेत आपण सफल होणं शक्य नाही.  त्यामुळे याठिकाणी कृषी पर्यटन केंद्राच्या उभारणीपासून ते कशा पद्धतीने चालवले पाहिजे ते कशा पद्धतीने टिकवले पाहिजे याच्या संबंधित असणाऱ्या सगळ्या मुद्द्यांचे प्रशिक्षण एका चांगल्या प्रशिक्षकांकडून त्यांनी घेतला पाहिजे.

संशोधनाची गरज  ( Need Research In Agro Tourism)

दुर्दैव म्हणा किंवा काही म्हणा पण भारतात संशोधन या विषयी जास्त महत्व नाही.  त्याची अनेक कारणे आहेत.  कृषी पर्यटन क्षेत्रात तर संशोधन होऊ शकते.  असा विचार करणारे दुर्मिळचं. आपले ग्राहक कोण आहेत.  कुठे आहेत.  पर्यटकांची गरज काय आहे.  कृषी पर्यटन केंद्रांची माहिती,  केंद्रांचे वेगळेपण, मार्केटिंग, सर्वे, मुलाखती या स्वरूपाचे कृषी पर्यटन आणि पर्यटकांविषयी संशोधन होणे गरजेचं आहे.  कृषिप्रधान देशांमध्ये कृषी पर्यटनासारख्या व्यवसायमध्ये संशोधन करणे ही काळाची फार मोठी गरज आहे आणि या गरज पूर्तीसाठी अनुभवी लोकांनी, तज्ञ, अभ्यासू मंडळींनी खऱ्या अर्थाने लक्ष घातले पाहिजे. यामुळे भारतीय संस्कृती आणखी समृद्ध होईल. कृषी पर्यटनातील संशोधनामुळे देश-विदेशातील लोकांना भारतीय ग्रामीण आणि कृषी पर्यटनाविषयी अभिमान वाटेल असं संशोधन करणे गरजेचे आहे. 

https://agrotourismvishwa.inagro-tourism-policy-maharashtra/

 

कृषी पर्यटनातील संधी व फायदे (Opportunities and Benefits in Agri-Tourism)

 

 

कृषी पर्यटन शेतीपूरक व्यवसाय ( Agro tourism is Supplementary Business)

महारष्ट्रातील काही भागात पंधरा सोळा वर्षांपासून शेतकऱ्यांना कृषी पर्यटन केंद्र संजीवनी ठरत आहे.  निसर्गाच्या लहरीपणा, कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ, बदलते ऋतुचक्र, पर्यावरणाचे असमतोल अशा निसर्गाच्या संकटात शेतकरी सापडला आहे.  भारत हा कृषीप्रधान देश आहे. आदिम काळापासूनच शेती केली जाते. याच शेतीवर अनेक पिढ्या आपला उदरनिर्वाह करीत आल्या आहेत.  पूर्वीची शेती करण्याची पद्धत आणि आताच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. या बदलांसह शेतीपूरक व्यवसायातही अनेक बदल झाले आहेत. काळानुसार बदलणे हे विकासाचे तसेच समृद्धी मार्गावर जाण्याचे लक्षण आहे.  शेतीपूरक अनेक व्यवसाय आहेत.  त्यापैकी एक म्हणेज कृषी पर्यटन.  कृषी पर्यटनाचे वाढते महत्त्व लक्षात घेता, भविष्यात कृषी पर्यटन हा सर्वोत्तम जोडधंदा नक्कीच ठरेल. महाराष्ट्रात कृषी पर्यटन या व्यावसायिक चळवळीचा मोठ्या प्रमाणात प्रसार आणि प्रचार होत आहे.

महाराष्ट्रातील कृषी पर्यटन (Agri Tourism In Maharashtra) 

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कृषी पर्यटनाचा विस्तार होत आहे; याचे महत्त्वाचे कारण म्हणजे झपाट्याने होत असलेले शहरीकरण होय. या शहरीकरणाचा फायदा शेतकऱ्यांना घेता येऊ शकतो.  शेतकऱ्यांच्या आत्महत्या, हवामानात होणारे बदल, दुष्काळ (ओला, कोरडा), रासायनिक खतांचा भरमसाठ वापर, उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळत नाही.  शेती क्षेत्रातील संशोधन अत्यंत अल्प प्रमाणात होत असून, निसर्गाचा लहरीपणा, तुकड्या-तुकड्यांची शेती, निसर्गाची अवकृपा या सर्व कारणासांठी शेतकऱ्यांना शेती परवडत नसल्याचे आपण पाहतो, ऐकतो, वाचतो.  एवढेच नाही तर समाजमाध्यामतून चर्चासुद्धा करतो. याचाच परिणाम म्हणजे शेतात उत्पादन खूपच कमी होते. 

उत्पादन कमी म्हणजे शेतकरी तोट्यात जाणार.  याचा फटका कुटुंबाला आणि अप्रत्यक्ष गावाच्या आर्थिक उलढालीत जाणवतो.  शेतकरी नेहमीच आर्थिक अडचणीत जगत असतो.  या सगळ्यातून बाहेर पडायचे किंवा मार्ग काढायचा असेल तर काही तरी शेती पूरक व्यवसाय करणे जिकीरीचे ठरत आहे. मराठवाडा आणि विदर्भात तर शेतकऱ्यांच्या जास्त आत्महत्या होतात.  कृषी पर्यटनाच्या माध्यमातून या आत्महत्या आपण रोखू शकतो.  कृषी पर्यटनाच्या माध्यमातून आज असंख्य शेतकरी आपल्या पायवर उभे राहत आहेत.  शेतकरी ताठ मानेने गावात कृषी व्यवसाय करत आहेत.  या व्यवसायातून कुटुंबाचा आणि पर्यायाने गावाचाही विकास होताना दिसत आहेत.  यातून रोजगाराची संधी निर्माण होत आहेत.  गावातून होणारे स्थलांतर थोड्याफार प्रमाणात तरी कमी झाले आहे.  महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांनी दूरदृष्टीचा विचार करून कृषी पर्यटन केंद्र सुरु केले आहेत. काही पर्यटन केंद्रे यशस्वीही झाली आहेत. चंद्रशेखर भडसावळे यांचे सगुणा बाग (रायगड),  मनोज हाडवळे यांचे पराशर कृषी पर्यटन केंद्र (जुन्नर, पुणे),  तापोळा कृषी पर्यटन शेतकरी व्यावसयिक कंपनी- गणेश उत्तेकर व काही युवा प्रयोगशील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तापोळा या कोयना बॅक वॉटर असलेल्या महाबळेश्वर नजीकच्या ठिकाणी कृषी पर्यटन व्यावसायिक शेतकऱ्यांची कंपनी स्थापन केली आहे.  पांडुरंग तावरे यांनी राज्यातील विविध कृषी पर्यटन व्यावसायिकांना कृषी पर्यटन विकास संस्थेच्या माध्यमातून एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.  पळशीवाडी ता. बारामती, जि. पुणे येथील पर्यटन केंद्र शहरी पर्यटकांची नाळ ग्रामीण भागाशी जोडण्याचे काम करत आहेत. राहूल जगताप यांचे अंजनवेल कृषी पर्यटन केंद्र पर्यटकांच्या पसंतीला उतरले आहे. राज्यात अंजनवेल कृषी  पर्यटन केंद्र आदर्श कृषी पर्यटन म्हणून ओळखले जात आहेत. फळ झाडे, भाजीपाला नर्सरी, कलाकृती, वस्तू प्रदर्शन यातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल.  कृषी पर्यटन केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे आणखी एक स्रोत मिळून त्यांच्या आर्थिक विकासाला हातभार लागू शकतो. शेतकरी कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून शेतकरी शेतीचा विकास नक्कीच करू शकतो असा आत्मविश्वास महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. ही एक आनंदाची बाब म्हणता येईल !!!

https://agrotourismvishwa.inworld-agri-tourism-day-activities/

 कृषी पर्यटन व गावाचा विकास  (Development of the Village Through Agri-Tourism)

कृषी पर्यटन ही ग्रामीण विकास मधील संधी नव्हे तर सुवर्णसंधी आहे.  पर्यटक कृषी पर्यटन केंद्रात राहण्यासाठी येतात. गावात, शेतात फिरतात.  ग्रामीण भागात काही दुर्मिळ औषध वनस्पती, विविध रोपांचे निर्मिती केले जाते. या दुर्मिळ घटकांचे माहिती पर्यटकांना नसते.  गावात एखादी मोठी नर्सरी असेल, फळबाग असेल, प्रसिद्ध ठिकाण, गूळ निर्मित केंद्र, अशा ठिकाणी फिरतात आणि वस्तू खरेदी करू शकतात.  यामुळे ग्रामीण भागाचा व्यवसाय वाढतो. यातून गावाचा विकास होण्यास मदत होते.  ग्रामीण भागातील वस्तू शहरात जाऊन विक्री करण्यापेक्षा तेच वस्तू जर कृषी पर्यटन केंद्रावर मिळत असेल शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल. यातून गावच्या विकासाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत होते.

गावातील काही महिला बचत गट असेल तर त्याचे पापड, लोणचं (आंबा, आवळा,लिबु ) शेवई इ. ग्राहक थेट खरेदी करू शकतात.  तसेच परीसरातील ऐतिहासिक, धर्मिक, धरण, धबधबा, या ठिकाणी अनेक छोटे मोठे दुकान, टपरी लावून स्थानिक लोक व्यवसाय करतात. यातून गावाचा नक्कीच विकास होतो. गावातील कालकृती उदा: बांबूचे टोपले, सूप बनवणे तसेच नीरा काढणे, मध काढणे तसेच इतर ग्रामीण भागातील पदार्थ वस्तू विक्रीतून विकास होऊ शकते. भाजीपाला लागवड, पशुपक्षी व्यवस्थापन, स्वयंचलित खत देणारी प्रणाली, चारा पिके, पॉलीहाऊस, फळप्रक्रिया,  बीजप्रक्रिया,  कृषी पर्यटन, शेततळी, पाणी देण्याची विविध पद्धती येथे एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे. 

कृषी पर्यटनातून रोजगार निर्मिती  (Jobs / employments creation in Agri Tourism Center)

कृषी पर्यटनातून ग्रामविकास आणि ग्रामविकासातून महाराष्ट्राचा विकास या संकल्पनेतून कृषी पर्यटनाचा विकास करता येईल.  ग्रामीण भागातील तरुणांची संख्या शहाराकडे येत आहेत.  याचे मुख्य कारण म्हणजे बेरोजगारी होय. ग्रामीण भागात कोणतेच व्यवसाय, उद्योग मोठे नाहीत.  काही छोटे मोठे व्यवसाय आहेत पण कामगारांना पगार कमी आहे.  इतर सोई-सुविधा नाही. या महागाईच्या काळात पाच-सहा हजार पगार परवडत नाही. यामुळे तरुणांचा ओढा शहराकडे मोठ्या प्रमाणत वाढत आहे.  हे स्थलांतर थांबवायचे असेल तर कृषी पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होण्यास वाव आहे. गावाचा इतिहास, गावाबद्दल माहिती असलेल्या तरुणांनी पर्यटकांना माहिती सांगण्याचे काम तरुणांच्या माध्यामतून होऊ शकते.  गावाचा इतिहास, संस्कृती, विविध वनसंपती यांविषयी माहिती हे तरुण पर्यटकांना देऊ शकतात.  यातून गावाची संस्कृती जपली जाते. आणि प्रत्येक पर्यटन केंद्रांना कमीत कमी पाच जास्तीत जास्त शंभर लोकांनाही रोजगार मिळू शकतो.

 कृषी पर्यटन केंद्र उभारणीसाठी मनुष्यबळ लागते. पर्यटकांचे नियोजन, मार्गदर्शन,  स्वयंपाकासाठी, शेतीकामासाठी, माळी काम, लॉड्री, ट्रेकिंग, बोटिंग, शिवार फेरी, बाजार खरेदी, ऑनलाईन मार्केटिग, जाहिराती, व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणत कामगार लागतात.  काही केंद्रांवर हंगामी कामगार काम करतात. बैलगाडी, टॅक्टर, उंट, विहरीत पाहणे, यासाठी प्रशिक्षकांची गरज भासते.  यामुळे ग्रामीण भागातच रोजगार मिळू शकेल.  ग्रामीण भागात महिला पुरणपोळी, भाकरी, विविध प्रकारच्या चटणी बनवतात. या कौशल्याचा उपयोग करून त्या मोठ्या प्रमाणत कृषी केंद्रासाठी रोजगार निर्माण करू शकतात. तसेच ग्रामीण भागातील पापड, लोणचं, स्थानिक खाद्य पदार्थ तयार करून कृषी पर्यटन केंद्रावर विक्रीसाठी ठेवता येते. स्थनिक कलाकार, हस्तकला, कलाकृती, दुर्मिळ वास्तू इ. दाखवण्यासाठीही मनुष्यबळाची गरज भासते.

आलेल्या पर्यटकांना मनोरंजन करण्सायाठी लोकगीत, लोककला सादर करण्यातून रोजगार निर्मिती होऊ शकते.   उदा : पोवाडा,  भजन, कीर्तन, भारूड, नृत्य, इत्यादींच्या माध्यमातून रोजगार निर्मितीची संधी या कृषी पर्यटनातून मिळू शकते. या व्यतिरिक्त प्रत्येक गावाची एक वेगळी ओळख व वैशिष्ट्य असते. नदी, ओढे, विहारी तलाव, धरण, शेततळे इत्यादी ठिकाणी रोजगार निर्मिती होते. सुतार, कुंभार, लोहार, यांच्या वस्तू पर्यटक खरेदी करतात. जत्रा यात्रा, उरूस, महोत्सव (आंबा, अंगूर) इ महोत्सवात पर्यटक सहभागी नोंदवतात आणि यातून गावातील प्रत्येक कलेचा संवर्धन होते. गावातील लोकांना पर्यटनच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होऊ शकते.

https://agrotourismvishwa.inhow-to-take-care-of-agri-and-rural-tourism-after-corona-pandemic/

 

बैलगाडीतून शिवारफेरीचा अनुभव घेताना पर्यटक

 संस्कृतीचे संरक्षण / संवर्धन  (Preservation / Conservation of Culture and Agro Tourism

 ग्रामीण संस्कृती, परंपरा, कलाकृती लोप पावत चालल्या आहे.  पूर्वी गावागावातील महिलांचा गट प्रत्येक घर घरात जाऊन गाणी गायाचे.  जुने गाणी, कथा, संस्कृती, परंपरा नष्ट होत आहेत. हे सर्व कृषी पर्यटनाच्या माध्यमातून जतन करता येईल.  गावातील ग्रामीण संस्कृती संपत आहे. ग्रामीण भागात पूर्वी लुगडे, धोतर पगडी परिधान करत असत.  गावातील संस्कृतीवर शहरांचा पगडा वाढत आहे.  गावातील घरे, रस्ते, गल्लीबोळ यात मोठ्या प्रमाणत बदल होत आहेत. पूर्वीची कौलारू घरे, घर शेणाने सावरणे, घरची रचना, अंगण तसेच वेशभूषा, केशभूषा, पारंपरिक पेहराव, राहणीमान, बोलीभाषा, चित्रकला इ. चे जतन आणि संवर्धन पर्यटन केंद्राच्या माध्यमातून होत आहे.  शहरी भागातील पर्यटक मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात येतात. त्यांना ग्रामीण संस्कृतचे विशेष आकर्षण असते. कृषी पर्यटनातून लोक ग्रामीण जीवन पाहतात, अनुभवतात आणि जगतात. यातूनच आपल्या ग्रामीण संस्कृतीचे संवर्धन होते.

गाव व समुदायाच्या संस्कृतीचे संवर्धन कृषी पर्यटनातून करू शकतो. Conservation of  Rural and Community Culture

 आदिवासी भागात त्यांची बोली भाषा, कला परंपरा लोप पावत आहे.  आदिवासी लोक ओळखत असलेली वनसंपत्ती व त्या वनसंपत्तीची गरज, उपयोग, महत्व कशासाठी होते. कोणते पीक केव्हा येते, त्याच्या उपयोग कधी करावा, याची माहिती फक्त या आदिवासी लोकांना आहे. या माहितीचे संक्रमण आणि संवर्धन होण्यासाठी कृषी पर्यटन केंद्र आहे.  यातून ग्रामीण भागात असलेल्या सर्वच घटकांचे संरक्षण होते आणि पर्यटकांना वेगवेगळी माहिती मिळते. पर्यटक आनंदित होतात. यामुळे प्रत्येक कृषी पर्यटन केंद्राचे नावही पर्यटक घेतात. तसेच त्या त्या गावाचे संस्कृतीचे जतन होते.

https://agrotourismvishwa.inimportant-desi-tree-plating-in-agri-tourism/

कृषी पर्यटन केंद्र लॉजींगला पर्याय (Agri-Tourism Centers Can be an Alternative to Lodging)

निसर्गाची ओढ प्रत्येकालाच असते.  निसर्गात रममान होण्यास सर्वांना आवडते. निसर्गाचे सौंदर्य पाहून त्याच्या प्रेमात कुणीही पडू शकतो.  असाच अनुभव कृषी पर्यटनाच्या माध्यामातून आपण घेऊ शकतो. काळानुसार पर्यटनाचे स्वरूप बदलत आहे.  ग्रामीण संस्कृती आणि शेती यांचा संगम आपण कृषी पर्यटनाच्या माध्यामातून अनुभवू शकतो. पूर्वी एका दिवसात पर्यटन करून आपण परत घरी येत असे.  आता शनिवार आणि रविवार तसेच इतर सुट्ट्यांमध्ये पर्यटक आपल्या सोईनुसार कृषी पर्यटन केंद्रावर मुक्कामी राहणे पसंत करतात. शेतात राहणे, काम करणे, पिकांचा प्रत्यक्ष स्पर्श अनुभवने यातून शहरी पर्यटकांची त्याठिकाणी रुळतात.

महाराष्ट्रातील अनेक शहरात मोठ-मोठे हॉटेल्स आणि लॉजींगची सुविधा आहे.  मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर यासारख्या शहरात पर्यटक लॉजमध्ये राहतात. दिवसभर पर्यटन स्थळी फिरून संध्याकाळी लॉजवर विश्रांतीसाठी येतात. कारण पर्यटनाच्या ठिकाणी त्यांना इतर कोणतेही पर्याय नसल्यामुळे लॉजमध्येच रहावे लागते. पण आता जर लॉजला पर्याय म्हणून कृषी पर्यटन केंद्राची निवड केली,  तर नक्कीच हे पर्यटक कृषी पर्यटन स्थळालाच प्राधान्य देतील. निसर्गाच्या सानिध्यात ते ही नयनरम्य अशा ठिकाणी कोणाला रहायला आवडत नाही. पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूर या शहरांच्या जवळ बरीच कृषी पर्यटन केंद्रे आहेत. पर्यटक आणि कृषी पर्यटक संपूर्ण जिल्हा फिरून कृषी पर्यटन केंद्रावर संध्याकाळी निसर्गरम्य परिसरात मुक्कामी राहू शकतात. मुक्कामी असलेला पर्यटक सकाळी आणि संध्याकाळी ग्रामीण संस्कृती जवळून अनुभवू शकतो. राहण्यापासून ते जेवण- खाण्यापर्यंतचे सर्व त्या कृषी पर्यटन केंद्रावर वेळेवर मिळते. 2017 मध्ये 15 % विदेशी पर्यटकांची संख्या वाढली. देशाच्या पर्यटन क्षेत्रात दोन लाख खोल्यांची( रूम्स) टंचाई आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यटनमंत्री के. जे अल्फान्स यांनी दिनांक 6-8-2018 रोजी लोकसभेत दिली.

 

कृषी पर्यटन केंद्रात राहण्याची व्यवस्था

ग्रामीण पर्यटनातून शेतकऱ्यांना पैसा आणि प्रतिष्ठा  (Money and prestige to farmers from rural tourism)

शेतकऱ्यांना कृषी पर्यटनाच्या माध्यमातून पैसे आणि प्रतिष्ठा मिळू शकते. प्रत्येक शेतकऱ्यांना आपला भाजीपाला घराघरात,  दारादारात जाऊन विकावे लागत असे. गावातील शेतात पिकलेले माल तालुक्याच्या ठिकाणी घेऊन जावा लागत असे. तेव्हा त्या शेतकऱ्याला कुठे तरी दोन चार पैसे मिळत असे. पण काळ आणि वेळा बदलत आहे.  शेतकरी आपला माल शेतातच विकत आहे. पर्यटनाच्या माध्यमातून शेकऱ्याना पैसे आणि प्रतिष्ठा मिळू शकते. कृषी पर्यटन नगदी व्यवसाय आहे. एक दोन दिवसाला शेतकऱ्यांना पैसे मिळते. यातून त्याचे प्रतिष्ठाही वाढते. शरीर आणि ग्रामीण नाते संबंध चांगले होते. आणि पर्यटकांकडून चागला मान सन्मान मिळते. तसेच गावातही शेतकऱ्यांना प्रतिष्ठा मिळते. शेतात विकलेली प्रत्येक वस्तू,  माल यातून शेतकरी आणि पर्यटन केंद्रांना पैसा मिळतो. कृषी पर्यटनाच्या मध्यामतून शेतकरी आपला उदरनिर्वाह करू शकतो.

पर्यटकांचा गावाबद्दल आणि शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आपल्या शेतात पाच दहा लोक येतात. राहतात, खातात, फिरतात काहीतरी खरेदी करतात. यातून शेतकऱ्याला आर्थिक मदत होते. तसेच सर्वसामान्यांचा शेतीकडे आणि शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. पूर्वी शेतकऱ्याला खूप, मान सन्मान होता. शेतकऱ्याचे उत्पन्नही जास्त होते. पण आता विविध कारणांनी शेतकरी संकटात सापडला आहे. पर्यटकांची एक दोन दिवसात घट्ट नाते तयार होते. यातून पर्यटक आणि शेतकरी यांच्यात आपलेपणाची भावना निर्माण होते. यामुळे चांगले संबध निर्माण होतात. पर्यटक वारंवार येतात. पर्यटकांची राहण्याची, खाण्याची सशुल्क व्यवस्था शेतकरी करतात. पर्यटक कुटूंब, नातेवाईक, मित्र परिवार सोबत येतात. सुटीच्या दिवशी आणि शनिवार, रविवार मोठ्या प्रमाणात येतात. कृषी पर्यटनामूळे शेतकऱ्यांना पैसा आणि प्रतिष्ठा प्राप्त होते.

https://www.youtube.com/watch?v=RsWR9ZyM9tg

कृषी पर्यटनातून स्थानिक कलाकारांना व्यासपीठ (A Platform for Local Artists in Agri Tourism)

कृषी पर्यटन केंद्र हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या समृद्धी देणार आहे शेतकऱ्याला प्रतिष्ठा देणारे क्षेत्र आहे.  ग्रामीण भागातील बारा बलुतेदार यांच्यामध्ये चांभार, कुंभार, साळी, माळी, शिंपी, कोल्हाटी, डोंबारी, गारुडी यांसारख्या अनेक मागासवर्गीय जमाती आहेत. त्यांच्यामध्ये असणारे कलागुण आहेत ते दाखवण्यासाठी त्यांना कृषी पर्यटन केंद्र हे एक हक्काचे व्यासपीठ निर्माण होते आणि त्या ठिकाणी आपली संस्कृती जपली जाते. या लोकांना अर्थार्जनाचे एक चांगले साधन निर्माण होते आणि आपण पाहतो की पूर्वी गावांमध्ये गोंधळी असायचा उत्तम पद्धतीने संबळ वाजवणारा हात गोंधळी लोकांना डीजेच्या कर्कश आवाज समोर किंवा विद्युत उपकरणामुळे कुठेतरी लोक पाहताना दिसू लागला. वासुदेवाची गाण्याची कला असे वासुदेव कुठेतरी लुप्त होताना दिसला आणि यामुळे गोंधळी याचा मुलगा हा गोंधळी न होता त्या ठिकाणी तो नोकरीच्या शोधात शहराकडे स्थलांतरित व्हायला लागला आणि अशाप्रकारे शहरात खेड्यातून शहराकडे जाणारे बेरोजगार तरुणांचा ओघ दिवसेंदिवस वाढतच गेला. शहराची लोकसंख्या वाढली, असुविधा निर्माण व्हायला लागली आणि प्रसंगी आपल्या कृषिप्रधान देशातील स्वातंत्र्यपूर्वकाळात 72,000 होती ती अनेक खेडी ओस पडली आणि अशा ओस पडलेल्या खेड्यांना नवसंजीवनी नवचेतना देण्याचे काम आहे हे कृषी पर्यटन केंद्रांमुळे यशस्वी होताना आढळतात.

कृषी पर्यटन आणि महिलांचे सबलीकरण (Agri-Tourism and Women Empowerment)

 

 

कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत व्हावी, आपली ग्रामीण संस्कृती जोपासली जावी आणि यातून शहराकडे तरुणांची होणारी वाटचाल थांबावी, ही जरी प्रमुख कारणे असली, तरी याचा आणखी एक फायदा होणार आहे. तो असा की, ग्रामीण भागातील शिक्षितच नव्हे, तर अशिक्षित महिलांना देखील रोजगार उपलब्ध होईल. आणि यातूनच महिला सबलीकरण होण्यास नक्कीच मदत होईल.

जेव्हा आपण एक आदर्श कृषी पर्यटन केंद्र उभे करतो, तेव्हा त्यामध्ये ठराविक अशा महत्त्वाच्या गोष्टी असणे गरजेचे असते. जसे की, पर्यटकांची राहण्याची आणि खाण्याची उत्तम व्यवस्था असावी लागते. येथील राहणीमानाला आणि खाण्यालादेखील ग्रामीण स्पर्श असावा लागतो. हे उत्तमरीत्या करू शकतात त्या महिलाच.

येथील महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून अनेक वस्तू स्वत:च्या हाताने बनवलेल्या असतात. अनेक खाद्य पदार्थ बनवलेली असतात. या वस्तू आणि हे खाद्य पदार्थ वेगळ्या धाटणीचे आणि विशिष्ट पद्धतीने बनवले असल्याने शहरातील लोक आवर्जून खरेदी करतील. यातून महिला बचत गटांना नक्कीच आर्थिक फायदा होवून त्यांच्या व्यवसायाला चालना मिळेल.

या कामांमधून महिलांना आर्थिक मदत तर नक्कीच होईल; शिवाय शहरातून येणाऱ्या पर्यटकांमधील महिला पर्यटकांना बघून त्यांचाही आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे किती महत्त्वाचे आहे, काम करणे किती गरजेचे आहे, त्यामुळे आपल्या कुटुंबाला हातभार लागतो. आणि आपल्याही आयुष्याला एक ध्येय प्राप्त होते, याची त्यांना जाणीव होईल. यातून त्याचे आणि कुटुंबियांचे देखील राहणीमान सुधारण्यास मदत होईल. विशेष म्हणजे आपल्या मुलांचे शिक्षण होणे किती गरजेचे आहे हे देखील त्यांच्या लक्षात येईल. अशाप्रकारे, कृषी पर्यटनातून मोठ्या संख्येने महिला सबलीकरण होऊ शकेल आणि शहरापेक्षा ग्रामीण जीवनच उत्तम असल्याची खात्री त्यांना पटल्याने ग्रामीण संस्कृती जोपासली जाईल याची नकळत खातरजमा होईल.

 

                                                                                                                                                                            लेखक : गणेश चप्पलवार (पर्यटन मित्र)

One Comment

  • अरविंद सुभाष सगभोर says:

    माझे नदिकाठी डोंगर उतारावर रस्त्याच्या कडेला आठ एकर क्षेत्र आहे.
    मला कृषी पर्यटन सुरु करण्यासाठी कोणत्या परवानग्या घ्याव्या लागतील?
    कृृषी पर्यटनासाठी कमीतकमी किती भांडवल लागेल?
    अर्थसहाय्य कोणाकडून मिळेल?
    मो. 8055333936

Leave a Reply