कृषी पर्यटन शेतीपूरक व्यवसाय

महारष्ट्रातील काही भागात पंधरा सोळा वर्षांपासून शेतकऱ्यांना कृषी पर्यटन केंद्र संजीवनी ठरत आहे. निसर्गाच्या लहरीपणा, कोरड दुष्काळ, ओला दुष्काळ, बदलते ऋतुचक्र, पर्यावरणाचे असमतोल अशा निसर्गाच्या संकटात शेतकरी सापडला आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. आदिम काळापासूनच भारतात शेती केली जाते. याच शेतीवर अनेक पिढ्या आपला उदरनिर्वाह करीत आल्या आहेत. पूर्वीची शेती करण्याची पद्धत आणि आताच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. या बदलांसह शेतीपूरक व्यवसायातही अनेक बदल झाले आहेत. काळानुसार बदलणे हे विकासाचे तसेच समृद्धी मार्गावर जाण्याचे लक्षण आहे. शेतीपूरक अनेक व्यवसाय आहेत. त्यापैकी एक म्हणेज कृषी पर्यटन. कृषी पर्यटनाचे वाढते महत्त्व लक्षात घेता, भविष्यात कृषी पर्यटन हा सर्वोत्तम जोडधंदा ठरेन. महाराष्ट्रात कृषी पर्यटन या व्यावसायिक चळवळीेचा मोठ्या प्रमाणात प्रसार आणि प्रचार होत आहे.

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कृषी पर्यटनाचा विस्तार होत आहे; याचे महत्त्वाचे कारण म्हणजे झपाट्याने होत असलेले शहरीकरण होय. या शहरीकरणाचा फायदा शेतकऱ्यांना घेता येऊ शकतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, हवामानात होणारे बदल, दुष्काळ (ओला, कोरडा), रासायनिक खतांचा भरमसाठ वापर, उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळत नाही. शेती क्षेत्रातील संशोधन अत्यंत अल्प प्रमाणात होत असून, निसर्गाचा लहरीपणा, तुकड्या-तुकड्यांची शेती, निसर्गाची अवकृपा या सर्व कारणासांठी शेतकऱ्यांना शेती परवडत नसल्याचे आपण पाहतो, एेकतो, वाचतो. एवढेच नाही तर समाजमाध्यामतून चर्चा सुद्धा करतो. याचाच परिणाम म्हणजे शेतात उत्पादन खूपच कमी होते.

उत्पादन कमी म्हणजे शेतकरी तोट्यात जाणार. याचा फटका कुटुंबाला आणि अप्रत्यक्ष गावाच्या आर्थिक उलढालीत जाणवतो. शेतकरी नेहमीच आर्थिक अडचणीत जगत असतो. या सगळ्यातून बाहेर पडायचे किंवा मार्ग काढायचा असेल तर काही तरी शेती पूरक व्यवसाय करणे जिकीरीचे ठरत आहे. मराठवाडा आणि विदर्भात तर शेतकऱ्यांच्या जास्त आत्महत्या होतात.  कृषी पर्यटनाच्या माध्यमातून या आत्महत्या आपण रोखू शकतो. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून आज असंख्य शेतकरी आपल्या पायवर उभे राहत आहेत. शेतकरी ताठ मानेने गावात कृषी व्यवसाय करत आहेत. या व्यवसायातून कुटुंबाचा आणि पर्यायाने गावाचाही विकास होताना दिसत आहेत. यातून रोजगाराची संधी निर्माण होत आहेत. गावातून होणारे स्थलांतर थोड्याफार प्रमाणात तरी कमी झाले आहे. महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांनी दूरदृष्टीचा विचार करून कृषी पर्यटन केंद्र सुरु केले आहेत.

काही पर्यटन केंद्रे यशस्वीही झाली आहेत. चंद्रशेखर भडसावळे यांचे सगुणा बाग, रायगड, मनोज हाडवळे यांचे पराशर कृषी पर्यटन केंद्र, जुन्नर, पुणे, तापोळा कृषी पर्यटन शेतकरी व्यावसयिक कंपनी-गणेश उत्तेकर व काही युवा प्रयोगशील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तापोळा या कोयना बॅक वॉटर असलेल्या महाबळेश्वर नजीकच्या ठिकाणी कृषी पर्यटन व्यावसायिक शेतकऱ्यांची कंपनी स्थापन केली आहे. पांडुरंग तावरे यांनी राज्यातील विविध कृषी पर्यटन व्यावसायिकांना कृषी पर्यटन विकास संस्थेच्या माध्यमातून एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पळशीवाडी ता. बारामती, जि. पुणे येथील पर्यटन केंद्रे शहरी पर्यटकांची नाळ ग्रामीण भागाशी जोडण्याचे काम करत आहेत. फळ झाडे, भाजीपाला नर्सरी, कलाकृती, वस्तू प्रदर्शन यातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल. कृषी पर्यटन केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे आणखी एक स्रोत मिळून त्यांच्या आर्थिक विकासाला हातभार लागू शकतो. शेतकरी कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून शेतकरी शेतीचा विकास नक्कीच करू शकतो असा आत्मविश्वास महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. ही एक आनंदाची बाब म्हणता येईल !!!

Leave a Reply