कृषी पर्यटन आणि शाळेची सहल

कृषी पर्यटन आणि शाळेची सहल

Agri-tourism and school trip

आपल्या बळीराजाला भक्कम आधार देण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून होणारा देशाचा आर्थिक विकास करण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना आमलात आणणे आणि त्याचा सर्वांना उपयोग होईल असे धोरण आखणे गरजेचे आहे. आणि सध्या अशीच एक विस्तारू पाहणारी संकल्पना म्हणजे कृषी पर्यटन केंद्र. या कृषी पर्यटन स्थळांचा उपयोग जसा शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी देणारा असेल, ग्रामीण भागातील लोकांना रोजगार देणारा असेल, शहरी लोकांना मानसिक समाधान देणारा असेल, तसाच या स्थळांचा उपयोग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा असेल. कसे ते पाहू…    

कृषी पर्यटन केंद्रात मातीपासून वस्तू बनवायला शिकताना विद्यार्थी.

आपण शाळेत असताना, साधारण तिसरीपासून आपल्याला भूगोल हा विषय शिकवला जातो. मात्र प्रात्याक्षिके ही अगदी अकरावी, बारावीला किंवा पदवीच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षाला असताना दाखवली किंवा करून घेतली जातात. त्यामुळे पुस्तकी ज्ञानावरून भूगोल सारख्या विषयात पैकीच्या पैकी मार्क्स नक्कीच पडतात, पण प्रत्यक्षात बघायला गेलं तर मातीचे साधे प्रकार किंवा रंग ओळखता येत नाहीत. जे जे विद्यार्थ्यी ग्रामीण भागातील असतील त्यांना या बाबत थोडीफार माहिती असते. हो, थोडीफारचं! कारण हल्ली सर्वांना आपल्या मुलांना फक्त शाळा शिकवून साहेब बनवायचं आहे. आणि म्हणून त्यांनादेखील घरी शेती असूनही त्यापासून लांब ठेवले जात आहे. पण या लहान वयातच विद्यार्थी प्रत्यक्षात शेतात जावून काही गोष्टी शिकले, तर ते त्यांच्या जास्तकाळ लक्षात राहील आणि माती, शेतकरी, ग्रामीण भाग याबद्दलचा त्यांचा जिव्हाळा वाढायला नक्कीच मदत होईल.

https://agrotourismvishwa.instaying-facility-in-agro-tourism-center/ 

आता तुम्हाला हे पटल असेल पण हे शक्य कसं होणार हाही प्रश्न पडला असेल, नाही ? तर तुमचा प्रश्न अगदी योग्यच आहे. आणि त्याचं उत्तर असं की, हे शक्य होणार आहे ते शाळा ज्या सहली काढतात, त्या सहलींच्या माध्यमातून. हो, बरोबर ऐकलंत.

https://agrotourismvishwa.inbest-agri-tourism-in-pune/

प्रत्येक वर्गाची वर्षातून एकदा किंवा किमान एकदा किंवा दोनदा सहल काढली जाते. याचं सहली (शालेय विद्यार्थ्यांच्या) नेहमी गड-किल्ल्यांवर, समुद्रावर नेल्या जातात. याठिकाणी फिरण्याचा आनंद जरी विद्यार्थ्यांना मिळत असला, तरीही याठिकाणी विद्यार्थ्यांच्या जीवाला असणारा धोकाही नाकारता येत नाही. त्यामुळे अशावेळी कृषी पर्यटन स्थळांना शालेय सहली घेऊन जाण केव्हाही उत्तमच. यातून विद्यार्थी फिरण्याचा आनंद तर घेऊ शकतातच; शिवाय वेगवेगळी पिके बघू शकतात, पर्यटन स्थळी लावलेली झाडे बघू शकतात, फुले, पाखरे, फळे प्रत्यक्ष बघू शकतात. रानमेवा चाखता चाखू शकतात. तसेच कोरडवाहू जमीन, पाण्याखालची जमीन हे प्रकार त्यांना कळू शकतील. शेततळे कसे बांधतात आणि त्याचा उपयोग कसा होतो हे माहीत होऊ शकते. शेताच्या आजूबाजूला उगवणाऱ्या अनेक छोट्या मोठ्या वनस्पती असतात, ज्या औषधी असतात, यांची देखील माहिती मिळते. बैलगाडी, नांगर, खुरपे,फावडे, टिकाव, घमेली अशा वस्तूंची माहिती होईल. गाई-गुरे, म्हैस, शेळ्या-मेंढ्या, कुककूटपालन व्यवसाय हे जवळून बघता येतील. तसेच ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांचे जीवनमान जवळून अनुभवता येईल.

कृषी पर्यटन केंद्रानविषयी माहिती जाणून घेताना विद्यार्थी.

नैसर्गिक स्रोतांची माहिती होईल, या भागात असणाऱ्या पवनचक्क्या, साखर कारखाने इत्यादी बघता येईल. ग्रामीण भागातील किंवा त्या ठराविक भागातील खाद्य पदार्थांचा आस्वाद घेता येईल. आणि यातूनच आपल्याला पोसणाऱ्या पोशिंद्याविषयी आपुलकी वाढेल. अर्थात हे काही कोण्या एकट्याचं काम नाही, त्यासाठी साखळी स्वरूपात काम करणे गरजेचे आहे. म्हणजे कृषी पर्यटन केंद्र असणाऱ्या व्यक्तीचा साखर कारखाना नक्कीच नसणार किंवा कुंकूटपालन व्यवसाय नसणार. अशावेळी आपली आणि आपल्या गावाची गरज ओळखून त्यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे.

तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांची सहलही होईल आणि त्यांच्या नकळत अभ्यासदौरा देखील होईल. अशा प्रकारच्या सहली सर्वच दृष्टीने उपयुक्त ठरू शकतील.

– ज्योती बागल

jyotisbagal@gmail.com

Leave a Reply