“अंजनवेल कृषी पर्यटन केंद्र” आणि पायऱ्यांचा डोंगर

“अंजनवेल कृषी पर्यटन केंद्र” आणि पायऱ्यांचा डोंगर

Anjanvel Agri-Tourism Center

अंजनवेल कृषी पर्यटन केंद्रा पासून अगदी जवळंच असलेल ट्रेकिंग साठीच देखणं ठिकाण. कुठंही न थांबता चालत राहिलं तर तासाभरात इथं पोचता येतं. साधारण अर्धा टप्पा पार केला की आपण धनगरवाड्यावर पोचतो, इथून थेट चढाई सुरू होते, गर्द झाडीतून गुरांची पायवाट धरून मजल दरमजल करत शिखरापर्यंत पोहोचताना फार दमछाक होत नाही.

चढाई संपताना शेवटच्या टप्प्यात समोर उंबराच्या पायाशी असलेला झरा दिसतो, त्याच्या उजविकडे आणि डावीकडे अशा दोन वाटा दिसतात, डावीकडे गेल्यावर लागतो तो पायऱ्याचा डोंगर आणि उजवीकडे वऱ्हाडाचा. आपण डावीकडची वाट धरून पुढच्या पाचच मिनीटात पायऱ्याच्या डोंगराच्या पठारावर पोचलेले असतो, त्या पठारावरून दिसणार दृश्य केवळ अवर्णनीय. हा माळ दुरदूरवर पसरलाय, त्याची लांबी रुंदी पायाखाली तुडवावी, आणि सह्याद्रीचं देखणं रूपडं मनात साठवावं.

अंजनवेल कृषी पर्यटन केंद्राचा परिसर.

धनगरवाड्यावरची गुरं ह्या माळावर जागजागी निवांत चरताना दिसतात, पावसाळ्यात आणि नंतरही दिवाळीपर्यंत ही गुरं इथंच असतात, दूरदूर पर्यंत पसरलेला माळ, त्यावरचं कोवळं लुसलुशीत गवत, जागजागी असलेली पाण्याची डबकी-झरे; आलाच पाऊस तर झाडांचा, जून्या वाड्या चा आडोसा आहेच, गुरांची खऱ्या अर्थाने चंगळ असते इथं, दोन चार महिन्यात खाणं पिण आणि आराम इतकाच उद्योग, त्यात ही गुरं चांगली पोसली जातात, रानोमाळ फिरून चरताना जागजागी त्यांचं शेण मूत्र पडतं, आणि पुढच्या वर्षीच्या गवताला खत पण आपसूक मिळतं.

https://agrotourismvishwa.injal-vishwa-agri-and-river-camp-tourism-in-tapola/

पाचगणी च्या टेबल लँड सारखाच किव्वा त्याहीपेक्षा मोठा असा हा माळ, नजरेचं पारणं फिटवतो, इथं शांत बसून छातीभरून श्वास घ्यावा आणि प्रसन्न व्हावं, शांत व्हावं. पूर्वेला पवन मावळातल्या शिळिंब, अजीवली, जवन, गेव्हंडे खडक अशा गावांच शिवार इथं बसून न्याहाळता येतं. पश्चिमेकडे मुळशी धरणाचा अथांग जलविस्तार आणि मुळशी खोरं न्याहाळता येतं.

इथला सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही कायम लक्षात राहतील असे, अथांग पसरलेल्या ह्या माळावर आपण एकटेच असतो, पण इथं एकटेपण जाणवत नाही, इथल्या उंचीची, वाऱ्याची, गवताची, गुरांची, डोंगरांची सोबत खूप आश्वासक, प्रेरक वाटते, खूप हलकं हलकं आणि प्रसन्न वाटतं इथं, परतीच्या वाटेवर पाय निघता निघत नाही. पायऱ्याचा डोंगर आणि हा माळ लक्षात राहतो.

https://agrotourismvishwa.inwho-and-how-start-agri-rural-and-farm-tourism/

एक पूर्ण दिवस घालवण्यासाठी किव्वा अगदी मुक्कामासाठी हे भन्नाट ठिकाण आहे, मित्रांसोबत चांदनी भोजन, तंबूतला मुक्काम, रात्री शेकोटीवरच्या गप्पा, आणि सकाळी माळावर पेटवलेल्या चुलीवरच्या वाफाळत्या चहाचे घोट घेत पाहिलेला सूर्योदय, हा अविस्मरणीय अनुभव असतो. हा माळ लक्षात रहातो.

लेखक – राहुल जगताप ( अंजनवेल कृषी पर्यटन, शिळिंब)

http://www.anjanvel.com

Leave a Reply