‘पराशर कृषी’ पर्यटनाचा वर्धापन दिवस

4 सप्टें 2020- 9 वा वर्धापन दिन.

9th Anniversary of Parshar Agri Tourism.

आपल्या, पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्राचा 9 वर्धापन दिन. 4 सप्टेंबरच्या या पूर्वसंध्येला, मागील 9 वर्षांचा काळ डोळ्यासमोरून जात असताना, अनेक गोष्टी आठवणीत येतात. आपल्या जिवाभावाचे असे अनेक पाहुणे लक्षात राहतात, अडचणीच्या काळात धावून आलेले मित्र आठवतात. पर्यटक म्हणून आलेले आणि नंतर अगदी जणु काही घरातीलच एक सदस्य, बनून गेले. अशी जिवाभावाची अनेक माणसे यानिमित्ताने आठवू लागतात. पर्यटनात काम करणारी ही आमची पहिलीच पिढी. वडिलोपार्जित शेती व्यवसाय, पुढे जाऊन शेतीचे शिक्षण आणि मग ५ वर्षांची, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सोबतच नोकरी. नोकरीचे ठिकाण, मला पर्यटनात येण्यासाठी निमित्त ठरलं. मी नोकरीला वर्ध्याला होतो, सेवाग्राम व पवनार याठिकाणी १-२ दिवसात जाणं व्हायचं, आणि मग त्याठिकाणी येणारी देश-विदेशातील लोकं,  ते कशासाठी भारतात येतात? या सर्व गोष्टींचा, प्रत्यक्ष चर्चा, गप्पा, वाचन, मनन आणि चिंतन या सगळ्यातून, कृषी व ग्रामीण पर्यटन या क्षेत्रात काम करावं वाटलं. आणि मग 2010 साली, स्टेट बँकेतील कृषी अधिकारी पदाच्या, नोकरीचा राजीनामा देऊन, पर्यटनात काम करण्यासाठी जुन्नरला, माझ्या जन्मगावी आलो. तोपर्यंत राज्यात कृषी पर्यटन या संकल्पनेने बाळसे धरायला सुरुवात केली होती. मीही त्याच चळवळीचा भाग बनत, अनेक कृषी पर्यटन केंद्रांना भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणाहून काहीना काही शिकायला मिळालं, आणि मग लहानपणापासूनच आजतागायत जी शेती मला समजली; मग त्यात शेती एक जीवनशैली, अन्नधान्याचा स्रोत, एक संस्कृती, समाजकारण व राजकारणाचं कारण, या सर्व अंगांनी शेतीकडे बघत असताना, भारतासोबतच, जगातील लोकांनाही या शेती संस्कृतीची ओळख व्हावी, म्हणून आपण या क्षेत्रात काम करावं. असं ठरवून पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्राची संकल्पना, नावारूपाला आली. पराशर हे नाव, आद्य कृषी संस्थापक पराशर ऋषींच्या नावावरून दिलं आहे.

https://hachikotourism.in/

 

निसर्गाच्या सानिध्यात निवांत विद्यार्थी

https://agrotourismvishwa.insuccess-story-of-parashar-agri-tourism/

 

त्यांचा “कृषी-पराशर” नावाचा ग्रंथ हा शेती विषयी बरच काही सांगून जातो. इतर वेळी शेती पर्यटन किंवा कृषी पर्यटनाला, चुलीवरचे जेवण, बैलगाडीतून रपेट व हुरडा पार्टी, या गोष्टींमध्ये बंदिस्त केलं गेलं असताना, मला मात्र या सगळ्या पलिकडच्या, कृषी व संस्कृती पर्यटनाची आस होती आणि गंमत म्हणजे, अशा प्रकारचे पर्यटन अनुभवू इच्छिणार्‍या लोकांनाही, अशाच एका संकल्पनेचा शोध होता. जुन्नर तालुक्यातील आळेफाटा जवळ, राजुरी या गावांमध्ये 4 सप्टेंबर 2011 रोजी, पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्राची सुरुवात झाली. अर्थात या संकल्पनेचा विचार त्याच्याही आधी झाला होता. महाराष्ट्रातील पहिला द्राक्ष महोत्सव 11 एप्रिल 2011 ला आपण आयोजित केला होता आणि त्याला उस्फुर्त असा प्रतिसादही मिळाला होता. पर्यटन क्षेत्राची कुठलीही पार्श्वभूमी नसताना, या आदरतिथ्य व्यवसायामध्ये, आम्ही येणाऱ्या पर्यटक पाहुण्यांकडूनच शिकत गेलो. सुरुवातीला पुण्या-मुंबईतून पाहुणे आले, नंतर राज्याच्या इतर भागातून येऊ लागले. नंतर जवळपास प्रत्येक राज्यातून, पाहुणे आपल्या पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्रावर ग्रामीण संस्कृतीच्या अनुभवाला आले. आणि एवढेच नाही तर गेल्या ९ वर्षात, जवळपास 24 देशांमधून, भारताच्या ग्रामीण संस्कृतीचा अनुभव घ्यायला, पाहुणे मंडळी आपल्याकडे आले. अगदी वर्षाला एक हजार म्हटलं तरी, गेल्या नऊ वर्षात 9000 देश-विदेशातील पाहुणे आपल्याकडे येऊन गेले. येणार्‍या लोकांनी मग केलं काय? मला नेहमी वाटतं, ग्रामीण संस्कृतीचा अनुभव घेण्याच्या निमित्ताने, ही सर्व मंडळी त्यांच्याही नकळत, स्वतःच्या शोधात इथपर्यंत आली होती. कदाचित त्यांना स्वतःचा शोध घेण्यात, या ठिकाणाची काही जरी मदत झाली असेल, तरी पर्यटन क्षेत्रात काम करण्याचा, आपला उद्देश सफल होतोय, असं वाटू लागतं. तसं बघायला गेलं, तर पहिल्या नजरेत आकर्षित करेल असं आपल्या इथं काहीच नाही. पण तरीसुद्धा असं काहीतरी आहे, की ज्याच्यासाठी आपले पाहुणे, पुन्हा पुन्हा इथे येत असतात, आणि त्यांच्या मित्रमंडळींनाही, पराशर वर जाण्याचा आग्रह करतात. मीही त्यांच्या सोबतीने इथं नेमकं काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करतो. स्थानिक पद्धतीची घरांची रचना, उसाच्या पाचटाचा उपयोग करून, बनवलेल्या भिंती, खाली शेणाने सारवलेली जमीन, पांघरण्यासाठी बचत गटाकडून शिवून घेतलेल्या गोधड्या, रूममध्ये टीव्ही नाही की एसी नाही, मनोरंजनासाठी खेळांची यादी नाही.

Parashar Agri Tourism

 

https://agrotourismvishwa.inparashar-agri-toruism/

अशा सगळ्या पार्श्वभूमीवर इथे येणारा माणूस स्वतःशी हितगुज करतो, सोबतच्या व्यक्तीसोबत मनसोक्त गप्पा मारतो, शेतावर फेरफटका करतो, जवळच्या डोंगरावरती पाय मोकळे करतो, जंगलात, तळ्याच्या काठी शोध सुरूच असतो. हाताशी वेळ असेल तर, जुन्नरमधील, इतर पर्यटन वैभव तो अनुभवतो. जुन्नरची लोकसंस्कृती,  खाद्यसंस्कृती, इतिहास, वारसा; शेतीचा वारसा आणि शेतीची प्रगती या सर्वच गोष्टी अनुभवण्यासाठी, समजून घेण्यासाठी, महत्त्वाची भूमिका बजावतात. जेव्हा आपण असे म्हणतो, भारत हा खेड्यांचा देश आहे, ग्रामीण बाजारपेठ मोठी आहे; तेव्हा ही ग्रामीण बाजारपेठ समजून घेणे, हे तितकच महत्त्वाचं ठरतं. मग इथं अर्थशास्त्र व व्यवस्थापन शिकणारे विद्यार्थी, आर्किटेक्टचे विद्यार्थी, शेती शिक्षण घेणारे विद्यार्थी, विविध खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था/कंपन्या, सरकारी सहली, शेतकऱ्यांच्या सहली, शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, मित्रांसोबतच्या सहली, कौटुंबिक सहल, शालेय सहली; अशा सर्वांसाठी, पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्र, हे आपलं हक्काचं ठिकाण वाटत आलंय. मग जे पर्यटकांकडून शिकलो, तेच इतरांना सांगण्यासाठी, सकाळ समूहाच्या माध्यमातून, हक्काचं व्यासपीठ मिळालं. आणि त्या व्यासपीठावर अनुभव कथन करत असताना, त्याचंच ‘कृषी पर्यटन- एक शेतीपूरक व्यवसाय” हे पुस्तक 2018 साली सकाळ प्रकाशनाने, प्रकाशित केलं. त्यासोबत अशा पर्यटनात काम करू इच्छिणारे, सामान्य व प्रगतिशील शेतकरी, खाजगी संस्था,महाविद्यालय शासकीय संस्था, यांना सल्लागार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पर्यटनाच्या या प्रवासात 2013 पासून, एमटीडीसीची सोबत, खूपच मोलाची ठरली आहे. 2019 रोजी एमटीडीसीने, पर्यटन मित्र पुरस्काराने, आपल्या कामाचा सन्मान केला.  गेले ५-६ महिने कोरोनाच्या जागतिक आपत्तीमुळे, पर्यटन क्षेत्र अडचणीत आलेले दिसत असलं तरीही, ही परिस्थिती फार काळ राहणार नाही. सुरक्षेची सर्व काळजी घेऊन, आपण आपल्या पाहुण्यांचं, सुरक्षित व काळजीपूर्वक स्वागत करण्यात सज्ज झालेलो आहोत. गेल्या ९ वर्षांच्या प्रवासात, आपल्या पाहुण्यांची, मित्रपरिवाराची आणि हितचिंतकांची जी साथ सोबत राहिली आहे, तशीच साथ भविष्यातही राहील असा विश्वास वाटतो. आपण सर्व या पराशर कृषी व संस्कृती परिवारात सामील झालात त्यासाठी आम्ही सदैव आपले ऋणी राहू.
धन्यवाद.

मनोज हाडवळे.

Leave a Reply