पुण्यातील प्रसिद्ध कृषी पर्यटन केंद्र

पुण्यातील प्रसिद्ध कृषी पर्यटन केंद्र

Famous agro tourism center in Pune

पावसाळ्यात निसर्ग आपल्या रंगाची मनसोक्त उधळण करत असतो. म्हणून अनेक लोक पावसाळ्यात फिरायला जायला पसंती देतात. पावसाळा म्हणजे हौशी पर्यटकांसाठी सुगीचे दिवस असतात. कोणी ट्रेकिंग करतात, कोणी थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात कोणी पर्यटक किल्ले पर्यटन करतात तर, कोणी हिल स्टेशनची सफर करतात. हे सगळं कमी जास्त प्रमाणात आपण सर्व जण करतोच. मात्र या व्यतिरिक्त ही पर्यटनाचा एक वेगळा ज्या ठिकाणी आपण मनसोक्त निसर्गाचा आनंद घेऊ शकतो तो प्रकार म्हणजे कृषी पर्यटन केंद्र.

https://agrotourismvishwa.inagro-tourism-is-a-place-of-study/

कृषी पर्यटन म्हणजे काय ? (What is Agro tourism)

गावचे गावपण अनुभवण्यासाठी शहरातील पर्यटकांसाठी बनवलेले खास ठिकाण म्हणजे कृषी पर्यटन केंद्र होय. थोडक्यात म्हणजे ग्रामीण जीवनाची अनुभूती घेणे म्हणजे कृषी पर्यटन होय. आपण आपली शेती संस्कृती विसरत चाललो आहोत. आपली गावाशी असलेली नाळ तुटत आहे. याच शेती संस्कृतीच्या पुन्हा जवळ जाणे , प्रत्यक्षात शेती कशी केली जाते. शेतात कोणते पीक कधी आणि कसे घेतले जाते. शेतात कोण-कोणती पीके कोणत्या ऋतुत येतात. एकंदरीत ग्रामीण भागातील शेती विषयक सर्व उपक्रम शेतात कसे राबवले जातात. ते प्रत्यक्षात शेतात जाऊन ते पाहणे, अनुभवणे, स्वत: शेतात काम करणे. अस्सल गावच्या जेवणाचा अस्वाद घेणे म्हणजे कृषी पर्यटन. विशेष म्हणजे ह्या सर्व सुविधा नाममात्र शुल्कात कृषी पर्यटन केंद्रात उपलब्ध होतात. 

https://agrotourismvishwa.inthe-two-important-aspects-of-agro-tourism-are-agrieducation-and-agritainment/ 

पराशर कृषी पर्यटन केंद्र, राजुरी-जुन्नर (Parashar Agro tourism Center, Rajuri-Junnar)

पराशर कृषी पर्यटन केंद्र, पुण्यापासून 90 कि. मी च्या आसपास जुन्नर तालुक्यातील राजुरी गावाजवळ आहे. पराशर कृषी पर्यटन केंद्रात प्रवेश केल्यानंतर एखाद्या गुरूकुलामध्ये आगमन केल्याचा भास होतो. अगदी ऐतिहासिक काळातील कुटीचे दर्शन या केंद्रात होते. या गुरूकुलामध्ये कृषी विषयीचे ज्ञान मनोज हडवळे यांच्याकडून सहज मिळतो.येथे राहण्याची आणि खाण्याची उत्तम व्यवस्था आहे. या पर्यटन केंद्राचे वैशीष्ट्ये म्हणजे येथे केवळ शुद्ध शाकाहरी जेवणच मिळते. पराशर ऋषी आणि जुन्नर तालुक्याचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर एकदा पराशरला कृषी पर्यटन केंद्राला नक्की भेट द्या.                                                                                                                                                                                                                                  

शालेय विद्यार्थांना शेती आणि गावसंस्कृती सांगताना केंद्र, संचालक मनोज हाडवळे. 


आमंत्रण कृषी पर्यटन केंद्र, गोळेगाव-जुन्नर (Amantran agro tourism center, Golegaon-Junnar)

खवय्यांसाठी प्रसिद्ध कृषी पर्यटन केंद्र म्हणजे आमंत्रण कृषी पर्यटन केंद्र होय. या पर्यटन केंद्रावर खाण्यासाठी दूरवरून पर्यटक येतात. येथे शाकाहरी आणि मासांहरी दोन्ही पद्धतीचे घरगुती जेवण मिळते. आमंत्रण कृषी पर्यटन केंद्रात पंचगव्याचे विविध उत्पादने मोठ्या प्रामाणात तयार केली जाते. मसाल्यांचे पदार्थही बनवले जातात. खाण्याचे आणि आयुर्वेदिक औषधीची वेगवेळे प्रयोग येथे खायला आणि पाहायला मिळतात. केंद्र प्रमुख शशिकांत जाधव स्वत: पंचगव्य उत्पादने तयार करतात. तसेच पंचगव्याचा प्रचार व प्रसार करतात. 

आमंत्रण कृषी पर्यटन केंद्रात पारंपरिक पद्धतीने स्वागत करताना.

अंजनवेल कृषी पर्यटन केंद्र, शिंळिंब-मावळ (Anjanvel Agro tourism Center, Shilimb-Maval)

मावळ प्रांत हा निसर्गाने सौंदर्याची मुक्त उधळण केलेला भाग आहे .पुण्यापासून 50-55 कि. मी अंतरावर मावळ तालुक्यात अंजनवेल कृषी पर्यटन केंद्र आहे. दहा एकरामध्ये हे कृषी पर्यटन केंद्र आहे. परिसरातील रांजण -खळगे असून केंद्राच्या बाजूला नदी वाहते. कृषी पर्यटनाच्या चारही बाजूचा परिसर डोंगराने व्यापला आहे. 2-3 कि. मी अंतरावर देवराई आहे. जवळंच 8 -10 कि. मी अंतरावर पवना धरण आहे. शिवार फेरी आणि वेगवेगळे छोटे- मोठे कौटुंबिक कार्यक्रम येथे घेऊ शकता. मावळ तालुक्यात पावसाळ्यात इंद्रायणी जातीच्या भाताची लावणी मोठ्या प्रामाणात केली जाते. अंजनवेल कृषी पर्यटन केंद्रात शुद्ध शाकाहरी आणि मांसाहरी ग्रामीण चवीचे जेवण मिळते. केंद्रात राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. एका वेळी 50-60 पर्यटक आरामात राहू शकतात. कृषी पर्यटन केंद्रात फक्त शेती आणि गावाचे दर्शन घडत नाही. तर या ठिकाणच्या पर्यावरणाची तसेच स्थानिक इतिहास-भूगोलाचीही माहिती मिळते.

अंजनवेल कृषी पर्यटन केंद्रात अस्सल गावरान जेवण.

तिकोना कृषी कृषी पर्यटन केंद्र, काशिंग-मुळशी   (Tikona Agro tourism Center, Kashing-Mulashi)

मुळशी तालुक्यातील हडशी जवळील काशिंग येथे सुरेश मराठे यांनी तिकोणा पिकनिक या नावाने कृषी पर्यटन केंद्र सुरू केले आहे . हे कृषी पर्यटन केंद्र पुण्यापासून फक्त 40 कि. मी अंतरावर आहे.तिकोणा कृषी पर्यटन केंद्र सह्याद्रीच्या कुशीत आणि ऐतिहासिक तिकोणा किल्याच्या पायथ्याशी वसलेले आहे. पर्यटकांसाठी उत्तम व्यवस्था आणि सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे मार्ट या संस्थेमार्फत उत्तम “महाराष्ट्र कृषी पर्यटन पुरस्कर 2019” देऊन गौरविण्यात आले आहे. ट्रेकिंग, भातलावणी, वृक्षरोपण, बैलगाडी सफर, जवळ असलेल्या तलावात बोटिंग, रूचकर जेवण आणि इतर तुमच्या आवडीच्या पारंपरिक खेळ येथे खेळायला मिळेल. त्या त्या ऋतुत आंबे त्यात हापुस, केसर, पायरी, तोतापुरी या जाती तसेच नारळ, चिकू, पेरू, आवळा लिंबू, संत्री अशी फळझाडे आणि अनेक प्रकारची शेकडो फुलझाडे, देशी वृक्ष, लॉन, आणि उत्कृष्ट प्रकारचं गार्डन, गवत आणि कौलारू झोपड्यांचा अनुभव आपण आपल्या परिवारसोबत येथे घेऊ शकतो. हे कृषी पर्यटन केंद्र पुण्यापासून फक्त 40 कि. मी अंतरावर आहे.

तलावाच्या काठी वसवलेले सुंदर असे तिकोना कृषी पर्यटन केंद्र.

 

                                                                                                                                                   सुप्रिया थोरात.

 

 

 

Leave a Reply