पक्षांचे माहेरघर पराशर कृषी पर्यटन केंद्र

पक्षांचे माहेरघर पराशर कृषी पर्यटन केंद्र

Birds home at Parashar Agri tourism Center

आजकाल पर्यटन ही चैनीची गोष्ट राहिलेली नसून तिचा सामावेश जगण्याच्या अविभाज्य घटकामध्ये झाला आहे. त्यातूनच पर्यटनाच्या वेगवेगळ्या वाटा व पर्याय विकसित होत आहेत. शहरातील पर्यटकांना धकाधकीच्या व तणावपूर्ण जिवनातून विश्रांती व मनशांती मिळवण्यासाठी कृषी पर्यटन हा महत्त्वपूर्ण पर्याय उपलब्ध झाला आहे. याच कृषीपर्यटनाबरोबर जर पक्षीपर्यटन बघायला मिळाले तर….. वाह! क्या बात है. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात राजुरी गावात असलेले पराशर कृषी पर्यटन केंद्र हे आपल्याला कृषी पर्यटनाबरोबरच पक्षी पर्यटन अनुभवण्याची संधी देते. पर्यटन केंद्रात पक्षांचा व फुलपाखरांचा बिनधास्त असणारा वावर पर्यटकांना पक्षी निरिक्षणाचा मनसोक्त आनंद देते.

पुण्यापासुन ९० कि.मी. अंतरावर जुन्नर तालुक्यात हे पर्यटन केंद्र आहे. एन.एच.५० मार्गावरील आळेफाटा या गावापासुन ४ कि.मी. अंतरावर पराशर कृषी पर्यटन केंद्र आहे. ११ एप्रिल २०११ रोजी म्हणजेच सात वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेले कृषी पर्यटन केंद्र हे पक्षी पर्यटन केंद्र म्हणूनही प्रसिद्ध झाले आहे. या पर्यटन केंद्रात पर्यटक सुट्ट्यांमध्ये येतात, मात्र पक्षी हे चोवीस तास वास्तव्यास असतात. आलेल्या पर्यटकांना पक्षांसोबत रहायला मिळतं. पक्षांचा बिनधास्त वावर असणाऱ्या या पर्यटन केंद्रात दिवसभर चिमण्यांचा चिवचिवाट तर इतर पक्षांचा किलबिलाट सुरू असतो. केंद्रामध्ये जवळपास २० ते २५ प्रकारचे पक्षी वास्तव्यास आहे. यामध्ये प्रामुख्याने चिमण्यांची संख्या लक्षणीय आहे. जणूकाही चिमण्यांचं जवळपास दिवसरात्र संम्मेलनच भरलेलं आहे असं वाटतं. थोडक्यात कृषी पराशर केंद्र चिमण्यांचं माहेरघर बनलेलं आहे. सतत चिमण्यांचा सुरू असणारा चिवचिवाट पर्यटकांना सुमधुर संगीत ऐकण्याची व वेगळ्या जगात आल्याची अनुभूती देते.

 

केंद्रामध्ये असणाऱ्या जैवविविधतेमुळे व निरनिराळ्या झाडांमुळे पक्षी या केंद्राकडे आकर्षित होत आहेत. केंद्रात असणाऱ्या फळझाडांमुळे व कीटकांमुळे पक्षांच्या अन्नाची व भक्ष्यांची सोय होते. तसेच निरनिराळ्या झाडांवर त्यांच्या राहण्याची व्यवस्था होते. पक्षांना सहजतेने खाद्य उपलब्ध व्हावे म्हणून विशेष करून चेरी या वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. चेरी वृक्ष हे केंद्रातील पक्षांचे आवडते खाद्य असून दाट सावलीमुळे राहण्याचे ठिकाणही आहे. याठिकाणी चिमण्यांबरोबरच पोपट, किंगफिशर, पारवा, कोकीळा, भारद्वाज, नीळकंठ, कोतवाल, कावळा, बुलबुल, सातभाई, खारिक मैना, हळद्या, सुतार, तांबट, मुनिया धोबी, धनेश होला, दयाळ यांसारखे अनेक पक्षी आढळतात. म्हणजेच वास्तव्यास आहेत. जेवढी पक्षांची विविधता जास्त तेवढाच तो अधिवास चांगला. केंद्राचे संचालक मनोज हाडवळे हे पक्षीप्रेमी असल्याने त्यांनी केंद्रात पक्षी संपदा जोपासली आहेत. विशेष म्हणजे हे सर्व रानपक्षी आहेत. यातील कोणताही पक्षी पाळलेला नाही. परंतु सर्वच पक्षी विलक्षण माणसाळलेले आहेत. पक्षांच्या व फुलपाखरांच्या उपस्थितीमुळे या कृषीपर्यटनाला पक्षीपर्यटनाची जोड मिळाली आहे. पक्षी निरिक्षणाचा छंद जनमानसात दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होत चाललेला आहे. पक्षी निरीक्षक व पक्षी प्रेमींसाठी हे एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. केंद्रातील फळझाडे, फुलझाडे यामुळे पक्षांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. केंद्रात निरनिराळ्या झाडावर पक्षांनी घरटी बनवून आपला आधिवास निर्माण केला आहे.

https://agrotourismvishwa.intapola-is-agri-tourism-village/

पक्षांना निसर्गाचे सफाईदूत म्हणतात. या केंद्रात हे म्हणणे तंतोतंत लागू पडते. पक्षांकडून अप्रत्यक्षपणे केंद्राच्या सफाई करण्याच्या कामात हातभार लागतो. पक्षांचा उपयोग केवळ निरीक्षणासाठी नाही, तर हे पक्षी इतर महत्त्वपूर्ण कामात उपयोगी पडतात. पक्षी फुलांवरील झाडांवरील किटक खावून कीडनियंत्रक म्हणून पण काम करतात. फुलपाखरांमुळे व पक्षांमुळे फुलांचे परागीभवन होण्यास मदत होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पक्षी बीजप्रसारकाचे कार्य करतात. त्यातून वनीकरणाला हातभार लागतो. पक्षांचे निसर्गसमतोल राखण्यामध्ये मोलाचे योगदान आहे. म्हणतात की, माणसाविना पक्षी जिवंत राहू शकतात परंतु पक्षाविना माणूस निसर्गात तग धरून राहू शकत नाही.

लेखिका :  सुप्रिया थोरात. 

https://agrotourismvishwa.injal-vishwa-agri-and-river-camp-tourism-in-tapola/

Leave a Reply