कृषी पर्यटनातुन ग्रामीण संस्कृतीचे संरक्षण / संवर्धन-भाग 2

पूर्वीची कौलारू घरे, घर शेणाने सावरणे, घरची रचना, अंगण तसेच वेशभूषा, केशभूषा, पारंपरिक पेहराव, राहणीमान, बोलीभाषा, चित्रकला इ. चे जतन आणि संवर्धन कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून होत आहे. पर्यटन केंद्रात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत तुतारी या पारंपरिक वाद्य वाजवून होते. कृषी पर्यटनामध्ये मातीच्या भिंती व ऊस पाचटाचे आच्छादन असलेली झोपडी, बांबूचे घर, आंगण, परसबाग, आंबा, नारळ यांसारखी झाडे, तंबू, बैलगाडीची सफर, बैठकीसाठी झाडांच्या खोडांपासून नैसर्गिक बैठक व्यवस्था, झाडांना झोपाळे, झोके, झाडावर चढण्यासाठी रस्सी, पक्ष्यांसाठी खोपे व पाण्याची व्यवस्था, रात्री मोकळ्या आकाशातल निरभ्र चांदणं, पारंपरिक गोष्टींचं प्रात्यक्षिक पाहण्याच्या गोष्टी. उदा: सूत काढण्यासाठी चरखा, मडकं तयार करण्यासाठी फिरतं चाक, खेळाचा आनंद घेण्यासाठी विट्‌टी दांडू, गोट्या, चकारी, गोफण, गलोल या ग्रामीण खेळांचं साहित्य, शिकं, (शिंकाळं) उखळ, वरवंटा, खलबत्ता, पाटा, चूल या कालबाह्य होत असलेल्या वस्तूंचं जतन व संवर्धन कृषी पर्यटनाच्या माध्यमातून जतन व संवर्धन केले जाते. पर्यटकांना त्या गोष्टी पाहता येतात तसेच प्रत्यक्ष हाताळून अनुभवताही येतात.

कृषी पर्यटन केंद्रात लोककलाही दाखवल्या जातात. ग्रामीण लोककलांमध्ये भारुड, गोंधळ, जागरण, कीर्तन, वासुदेव, गारुड्याचा खेळ, डोंबाऱ्यांचा खेळ, लेझीम खेळणे इत्यादींचे प्रात्यक्षिक दाखवले जाते. पिकांमध्ये भात, बाजरी, गहू, मका, ज्वारी, तूर, मुग, उडीद, भुईमूग इत्यादी पिकांची लावणी, व्यवस्थापन, काढणी व वितरण बाबत माहिती, प्रत्यक्ष कार्यानुभव दिला जातो. याशिवाय हरितगृह, रोपवाटिका, आंबा, काजू, संत्रा, मोसंबी, द्राक्ष इत्यादी फळपिकांची लागवड, व्यवस्थापन, काढणी, प्रक्रिया व विपणनबाबत तसेच दुग्धव्यवसाय, पशूपालन, कुक्कुटपालन याबाबत माहिती व प्रत्यक्ष कार्यानुभव दिला जातो.

पूर्वी ग्रामीण व वनक्षेत्रात आदिवासी लोक रहायचे आता ते आजूबाजूच्या प्रदेशात विस्थापित झाले आहेत. त्यामुळे आदिवासी भागात त्यांची बोली भाषा, कला परंपरा लोप पावत आहे. आदिवासी लोक ओळखत असलेली वनसंपत्ती व त्या वनसंपत्तीची गरज, महत्व, उपयोग कशासाठी होतो कोणते पीक केव्हा येते, त्याच्या उपयोग कधी करावा, याची माहिती फक्त या आदिवासी लोकांनाच आहे. या माहितीचे संक्रमण संवर्धन होण्यासाठी कृषी पर्यटन केंद्रांची मदत होते. यातून ग्रामीण भागात असलेल्या सर्वच अनमोल घटकांचे संरक्षण होते आणि पर्यटकांना वेगवेगळी माहिती मिळते. पर्यटक आनंदित होतात. तसेच त्या त्या गावाचे संस्कृतीचे जतन होते.

लेखिका : सुप्रिया थोरात

Leave a Reply