कृषी पर्यटनातून सामुदायिक विकास

Community Development through Agri-tourism  कृषी पर्यटनातून सामुदायिक विकास

कृषी पर्यटन ही नव्याने उदयाला आलेली संकल्पना मोठ्या प्रमाणात विस्तारत असून राज्यात कृषी पर्यटन केंद्रांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कृषी पर्यटनाविषयी लोकांना आवड निर्माण होत आहे , जागरूकता निर्माण होत आहे. याचेच फलित म्हणजे कृषी पर्यटन केंद्रांमुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधीही वाढत आहेत. कृषी पर्यटन या संकल्पनेचा मुख्य उद्देश ‘कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास आणि ग्रामीण विकासातून महाराष्ट्राचा विकास’ आहे. लोकांना ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देण्याबरोबरच गावातील शेतकऱ्याला आर्थिक उत्पन्न , रोजगार मिळवून देण्याचा दृष्टिकोन या उपक्रमामागे आहे. जाणून घेऊयात कृषी पर्यटनातून सामुदायिक विकास कसा साधता येईल याविषयी –

कृषी केंद्र चालकांशी संवाद साधताना ॲग्रो टुरिझम विश्वची टीम

कृषी पर्यटन एकात्मिक प्रकल्प आहे. (Agro tourism is Integrated Project )

कृषी पर्यटन म्हणजे शहरी जीवनशैलीचा कंटाळा आलेल्या लोकांनी गावाकडे शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन राहणे, ग्रामीण जीवन संस्कृती व निवांतपणा अनुभवणे आणि त्याबदल्यात शेतकऱ्याने या शहरी पर्यटकांचा सशुल्क पाहुणचार, आदरतिथ्य करणे.

 https://agrotourismvishwa.inimportant-desi-tree-plating-in-agri-tourism/

कृषी पर्यटनातून सामुदायिक विकास कसा साधता येईल ? (How can Community Development be achieved through Agro-tourism?

कृषी पर्यटन केंद्र उभारण्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज नसते. एक एकर एवढ्या कमी जागेत निसर्गपूरक कृषी पर्यटन केंद्र उभारले जाऊ शकते. कृषी पर्यटन केंद्र उभारण्यासाठी मनुष्यबळ लागते. साधारण एका पर्यटन केंद्रामुळे कमीतकमी पाच आणि अधिकाधिक शंभर लोकांना रोजगारही मिळू शकतो.

कृषी केंद्रावर आलेल्या पर्यटकांचे नियोजन करणे, त्यांना मार्गदर्शन करणे, केंद्रावर स्वयंपाक बनवण्यासाठी, शेतीकामासाठी, माळीकाम, शिवारफेरी, बाजारखरेदी, ऑनलाईन मार्केटिग, जाहिराती, व्यवस्थापनासाठी यांसारख्या कामगार लागतात. यातील काही कामगार हंगामी कामगार म्हणूनही काम करतात. ही कामे केंद्रचालकांनी गावातील लोकांवर सोपवली त्यांनाही रोजगार उपलब्ध होईल. पर्यटकांना ग्रामीण खाद्य पदार्थांची माहिती देण्यासाठी, शेतीच्या अवजारांची माहिती देण्यासाठी, हस्तकला, सण, उत्सव, जत्रा यांची माहिती देण्याचे काम स्थानिक लोकांना दिल्याने  त्यांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. 

पर्यटन केंद्राच्या जवळील ठिकाणांना भेट देताना पर्यटक

कृषी पर्यटनाच्या माध्यमातून कृषी उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळवून देता येऊ शकते. ताजा व सेंद्रीय भाजीपाला-फळं, कृषी पूरक व्यवसायातून निर्मित केलेल्या वस्तू केंद्रावर विक्रीस ठेवल्यास पर्यटक त्या विकत घेऊ शकतात. पर्यटन केंद्रांच्या बाजूच्या शेतीमध्ये पेरू, द्राक्षे, नारळ, आले, बटाटा, केळी, आंबा, हळद, आवळा अशी पिके घेतली आणि त्यापासून जर उत्पादने बनवली तर ती पर्यटकांना विक्रीसाठी ठेवता येतील. या प्रक्रिया उद्योगातून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल आणि पर्यटकांनाही  ताजी आणि घरगुती पद्धतीने बनवलेली उत्पादने मिळतील. केंद्रावरच उत्पादन विक्री केंद्र असल्याने त्यासाठी वेगळी जागा आणि खर्च करायला लागत नाही आणि आलेला पर्यटक काही ना काही खरेदी करतोच. त्यातून अतिरिक्त उत्पन्न आपोआप चालू होऊ शकतं. 

https://agrotourismvishwa.inrural-agro-tourism-and-holiday/

ग्रामीण भागातील महिलांना कृषी पर्यटन केंद्रांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. आलेल्या पर्यटकांना स्थानिक व अस्सल  गावरान जेवण उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंपाकी लागतोच. स्थानिक महिला हे काम उत्तमरीत्या करू शकतात. यामुळे स्थानिक महिलांना देखील काम आणि रोजगार उपलब्ध होईल. महिलांनी किंवा महिला बचत गटांनी बनवलेले खाद्यपदार्थ किंवा वस्तू उदा. पापड, लोणचं, गोधड्या, शोभेच्या वस्तू तयार करून कृषी पर्यटन केंद्रावर विक्रीसाठी ठेवता येतील.

पराशर कृषी पर्यटन केंद्र

कृषी पर्यटन केंद्रात भारुड, गोंधळ, जागरण, कीर्तन, वासुदेव, गारुड्याचा खेळ, डोंबाऱ्यांचा खेळ, लेझीम खेळणे यांसारख्या ग्रामीण कला दाखवल्या जातात. यातून स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव तर मिळतोच शिवाय त्यांना रोजगारही उपलब्ध होतो आणि त्या कलांचे जतनाही होते.  तसेच ग्रामीण भागातील लोककला, हस्तकला, खाद्य संस्कृती शहरी भागापर्यंत पोहचण्यासाठी देखील मदत होते. ग्रामीण व शहरी भागांत माहितीची, ज्ञानाची देवाण-घेवाण होते. कृषी पर्यटनाच्या माध्यामातून ग्रामीण भागातील राहणीमान उंचावू शकते.

https://agrotourismvishwa.inbest-agri-tourism-in-pune/

कृषी पर्यटनाच्या माध्यमातून गावाचा, शेतीचा आणि समाजाचा विकास होतो. Agri-tourism develops the village, agriculture and society.

ग्रामीण भागात काही दुर्मिळ औषध वनस्पती पर्यटन केंद्रावर जतन केल्या तर त्यांची माहिती घेऊन पर्यटक त्या खरेदीही करू शकतील.
किंवा गावात एखादी मोठी नर्सरी फळबाग असेल, प्रसिद्ध ठिकाण किंवा गूळ निर्मिती केंद्र, अशा ठिकाणी पर्यटकांना जरूर फिरायला न्यावे. या  ठिकाणांवरून पर्यटक काहीना काही खरेदी करतातचं. यामुळे साहजिकच स्थानिकांना मोबदला मिळून गावच्या विकासासही अप्रत्यक्षपणे हातभार लागतो. अशाप्रकारे शहरातील पैसा ग्रामीण भागात येऊ लागल्याने विकासाचा समतोलही राखला जाईल.गावात सुतार, चांभार, कुंभार यांसारखे स्थानिक कलाकार असतात त्यांच्या वस्तू जर केंद्रावर विक्रीसाठी ठेवल्यास त्यांनाही रोजगार मिळेल.गावाचा किंवा परिसरातील पर्यटन केंद्र , यात्रा , उरूस , उत्सव यांसारख्या ठिकाणी पर्यटकांना फिरायला न्यावे. त्या ठिकाणी पर्यटक खरेदी करतातचं.

अशा पद्धतीने एक कृषी पर्यटन केंद्र केवळ केंद्र चालकालाच नाही तर इतर स्थानिकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतं आणि साहजिकच कृषी पर्यटनातून सामुदायिक विकास होण्यास हातभारही लागतो.

Leave a Reply